‘दोन तासांत दिल्लीला या’ म्हणत पोलिसांच्या नावाने धमकी; डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात ४३ लाखांची फसवणूक
छत्रपती संभाजीनगर : ‘तुमच्याविरोधात दिल्लीमध्ये गुन्हा दाखल
झाला आहे. दोन तासांत दिल्लीला हजर व्हा, अन्यथा मोबाइल
क्रमांक बंद करण्यात येईल,’ अशी धमकी देत डिजिटल अरेस्टच्या
नावाखाली ४६ वर्षीय व्यक्तीची ४३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला
आहे. सिडको एन-२ येथील महाजन कॉलनीत राहणारे योगेश प्रकाश गुजर यांना सायबर
भामट्यांनी पोलिसांच्या नावाने भीती दाखवून विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा
करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘ट्राय’मधून बोलत असल्याचा बनाव
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश गुजर यांना ५ सप्टेंबर रोजी सकाळी
फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण दूरसंचार नियामक प्राधिकरणाशी (TRAI) संबंधित असल्याचे सांगितले. गुजर यांच्या मोबाइल क्रमांकावरून चुकीचे
संदेश पाठवण्यात आले असून, दिल्लीतील दर्यागंज येथे
त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले. दोन तासांत दिल्लीला हजर न
झाल्यास मोबाइल क्रमांक बंद करण्याची धमकीही देण्यात आली. यानंतर ७ आणि ९ सप्टेंबर
रोजी त्यांना व्हिडिओ कॉल करण्यात आले. कॉलवर दिल्ली पोलिसांच्या वर्दीसारखा पोशाख
परिधान केलेल्या व्यक्तींनी त्यांचे नाव कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी जोडले.
नरेश गोयल यांच्याशी संबंधित प्रकरणात त्यांचे एटीएम कार्ड सापडल्याचे आणि त्यांची
मालमत्ता जप्त केली जाऊ शकते, असे सांगून त्यांना घाबरवण्यात
आले.
‘सिक्रेट खात्यात’ पैसे जमा करण्यास
सांगितले
आरोपींनी गुजर यांना एका व्हिडिओ कॉलिंग ॲपचा वापर
करण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर त्यांच्या तीन बँक खात्यांची
माहिती घेण्यात आली. तपासाच्या नावाखाली खात्यातील रक्कम कथित ‘सिक्रेट सुपरव्हिजन
खात्यात’ जमा करण्यास सांगण्यात आले. २८ सप्टेंबर रोजी चेकबुक मिळाल्यानंतर गुजर
यांनी २२ लाख रुपये केरळमधील एका खात्यावर पाठविल्याचे वृत्त आहे. तसेच मुदत ठेव
(एफडी) मोडून पाच लाख रुपये जामखिंडीतील खात्यावर जमा केले. २ ते ४ ऑक्टोबरदरम्यान
विविध खात्यांतील रक्कम एकत्र करून १६ लाख ४० हजार रुपये जमा केल्याचेही फिर्यादीत
नमूद आहे. यानंतर ५ ऑक्टोबर रोजी आठ लाख रुपये दिल्लीतील उत्तमनगर शाखेच्या
खात्यावर, तर १२ ऑक्टोबर रोजी उर्वरित आठ लाख ४० हजार रुपये गोलेका मंदिर शाखेच्या
खात्यावर पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे. पैसे चार-पाच दिवसांत परत मिळतील, असे आरोपींनी सांगितले होते. मात्र, १५ आणि १९
ऑक्टोबर रोजी विचारणा करूनही पैसे परत मिळाले नाहीत.
व्हॉट्सॲपवरील लोगो हटल्याने संशय
आरोपींच्या व्हॉट्सॲप प्रोफाइलवर दिल्ली पोलिसांचा लोगो
असल्याचे सांगण्यात आले आहे. काही दिवसांनी हा लोगो हटवण्यात आल्याचे लक्षात
आल्यानंतर गुजर यांना संशय आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी
पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणात विजय खन्ना, राहुल गुप्ता आणि एका मोबाइल क्रमांकधारकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला
आहे. पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
नागरिकांनी डिजिटल अरेस्टच्या धमक्यांपासून सावध राहावे
पोलिस, न्यायालय किंवा सरकारी यंत्रणेच्या
नावाने फोन करून अटक, मालमत्ता जप्ती किंवा बँक खाते
तपासणीची भीती दाखवून पैसे मागितले जात असल्यास नागरिकांनी सतर्क राहावे. अशा
कॉलवर विश्वास ठेवून कोणत्याही अनोळखी खात्यात पैसे जमा करू नयेत. संशयास्पद कॉल
आल्यास संबंधित यंत्रणेच्या अधिकृत संपर्क क्रमांकावरून पडताळणी करावी आणि सायबर
फसवणूक झाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.