करमाळ्यात ऊसाच्या शेतात बिबट्याची तीन पिल्ले आढळली; विट परिसरात भीतीचे वातावरण

करमाळा : करमाळा तालुक्यातील विट येथे ऊसतोड सुरू असताना बिबट्याची तीन पिल्ले आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी (ता. २२) दुपारी शेतकरी गोकुळ ढेरे यांच्या शेतात ही पिल्ले दिसली. यापैकी एका पिल्लाला ऊसतोड कामगारांनी पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले, तर अन्य दोन पिल्ले पळून गेली. या घटनेनंतर शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. करमाळा तालुक्यातील विविध भागांत बिबट्या दिसल्याचे शेतकरी वारंवार सांगत आहेत. विट गावापासून सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या ढेरे यांच्या शेतात एकाच वेळी तीन पिल्ले आढळल्याने परिसरात बिबट्याचे वास्तव्य असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पूर्वीच्या हल्ल्याच्या आठवणींमुळे नागरिकांमध्ये चिंता

चार ते पाच वर्षांपूर्वी विटजवळील अंजनडोह येथे बिबट्याने एका महिलेवर हल्ला केला होता. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला होता. त्या घटनेपासून परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याबाबत भीती कायम आहे. त्यातच आता ऊसाच्या शेतात बिबट्याची पिल्ले आढळल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

रात्री कुत्र्यांच्या भुंकण्याकडे झाले दुर्लक्ष

शेतकरी गोकुळ भानुदास ढेरे यांनी सांगितले की, त्यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना कामगारांना अचानक बिबट्याची तीन पिल्ले दिसली. त्यापैकी दोन पिल्ले पळून गेली, तर एका पिल्लाला कामगारांनी पकडले. ढेरे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या वस्तीवरील कुत्री रात्रीच्या वेळी वारंवार भुंकत असत. मात्र, कुत्री कशामुळे भुंकत आहेत, याकडे त्यांनी लक्ष दिले नव्हते. आता शेतात बिबट्याची पिल्ले आढळल्यानंतर कुत्र्यांचे भुंकणे बिबट्याच्या संभाव्य हालचालींशी संबंधित असावे, अशी शक्यता त्यांना वाटत आहे.

वन विभागाने पाहणी करण्याची मागणी

या घटनेच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने परिसरात पाहणी करून बिबट्याच्या संभाव्य वास्तव्याची तपासणी करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तसेच शेतात काम करताना आणि रात्रीच्या वेळी वावरताना नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.