सोलापुरातील टिळक चौकात धोकादायक इमारतीचा भाग कोसळला; महापालिकेच्या कारवाईदरम्यान कर्मचारी जखमी
सोलापूर : शहरातील टिळक चौक-कुबेर गल्ली परिसरातील जुन्या आणि धोकादायक
इमारतीचा काही भाग गुरुवारी दुपारी अचानक कोसळला. या इमारतीबाबत स्थानिक
नागरिकांनी वारंवार सोलापूर महापालिकेकडे तक्रारी करूनही वेळीच कारवाई झाली
नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सुदैवाने इमारतीचा भाग कोसळला तेव्हा
रस्त्यावर कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, सायंकाळी महापालिकेच्या वतीने मलबा हटवण्याचे काम
सुरू असताना एक कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
अनेक वर्षांपासून इमारत जीर्ण अवस्थेत
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, टिळक
चौक-कुबेर गल्ली येथील ही इमारत गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत आहे.
पावसाळ्यात इमारतीच्या भिंतींना तडे गेल्याने ती कधीही कोसळू शकते, अशी भीती परिसरातील नागरिक व्यक्त करत होते. याबाबत महापालिकेकडे तक्रारी
करण्यात आल्या होत्या. मात्र, या तक्रारींकडे दुर्लक्ष
झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
वर्दळीच्या रस्त्यावर कोसळला मलबा
गुरुवारी दुपारच्या सुमारास इमारतीच्या दर्शनी भागाचा काही हिस्सा
कोसळून मलबा रस्त्यावर पडला. हा रस्ता वर्दळीचा असून येथून महिला, मुले
आणि ज्येष्ठ नागरिकांची सतत ये-जा असते. घटनेच्या वेळी रस्त्यावर कोणी नसल्याने
सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
“दैव बलवत्तर म्हणून आज अनेकांचे जीव वाचले; मात्र उद्या पुन्हा असा प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेच्या कारवाईदरम्यान कर्मचारी जखमी
घटनेनंतर सायंकाळी महापालिकेच्या वतीने मलबा हटवण्याचे काम सुरू
करण्यात आले. हे काम सुरू असताना महापालिकेचा एक कर्मचारी जखमी झाल्याची माहिती
आहे. संबंधित कर्मचाऱ्याला कितपत दुखापत झाली आणि त्याच्यावर उपचार करण्यात आले का, याबाबत
अधिक तपशील उपलब्ध नाही.
धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्याची मागणी
सोलापूर शहरात अनेक जुन्या आणि धोकादायक इमारती असल्याने महापालिकेने
तातडीने त्यांचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. धोकादायक इमारतींची
ओळख पटवून संबंधित मालकांना आवश्यक सूचना द्याव्यात आणि नागरिकांच्या
सुरक्षिततेसाठी नियमानुसार त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी
अपेक्षा व्यक्त होत आहे.
टिळक चौकातील घटनेनंतर तरी महापालिका प्रशासनाने अशा इमारतींकडे
गांभीर्याने लक्ष देऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी
मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.