माहूर घाटात १०० फूट खोल दरीत टेम्पो कोसळला; यवतमाळच्या तीन भाविकांचा मृत्यू

यवतमाळ : श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन परतणाऱ्या यवतमाळ येथील भाविकांच्या टेम्पोला माहूर घाटात भीषण अपघात झाला. घाटातील पहिल्या धोकादायक वळणावरून टेम्पो सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला, तर चालकासह केबिनमध्ये बसलेले अन्य दोघे जखमी झाले. गुरुवारी, १५ ऑक्टोबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे. यवतमाळ येथील बोरा डिजिटल आणि आयएफबी पॉइंट परिसरात काम करणारे सहा जण १५ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास ‘मॅक्सिमो जितो’ या छोट्या टेम्पोमधून (एमएच २९ बीई ६८५९) माहूर गडावर दर्शनासाठी रवाना झाले होते. दर्शन आणि अन्य कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पहाटे यवतमाळच्या दिशेने परत निघाले होते.

समोरून आलेल्या वाहनाच्या प्रकाशामुळे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज

माहूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामागील पहिल्या धोकादायक वळणावर टेम्पो आला असताना समोरून येणाऱ्या वाहनाचा प्रकाश चालकाच्या डोळ्यांवर पडल्याचे सांगण्यात येत आहे. समोरून येणारे वाहन विरुद्ध दिशेने आल्याने चालकाने टेम्पो बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो थेट खोल दरीत कोसळला. या वळणावर संरक्षक कठडा किंवा भिंत नसल्याने अपघाताची तीव्रता वाढल्याची शक्यता व्यक्त होत आहे. अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

दरीत पडून तिघांचा मृत्यू

टेम्पोच्या केबिनमध्ये चालक प्रतीक अरविंद अडकिने (वय २६), दत्ता मनोहर मेश्राम (वय ३५) आणि यशवंत अरविंद पाटील (वय २५) हे तिघे होते. त्यांना किरकोळ दुखापत झाली. टेम्पोच्या मागील हौद्यात बसलेले बाबाराव ज्ञानोबा टेकाम (वय ६०), राहुल सुधाकरराव ठाकरे (वय २५) आणि प्रीतम रामराव प्रधान (वय ३८) हे तिघे अपघातादरम्यान बाहेर फेकले गेले. दरीतील दगडांवर आदळल्याने तसेच टेम्पो आणि दगड अंगावर पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. यामध्ये दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर बाबाराव टेकाम यांचा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

पोलीस आणि स्थानिकांकडून बचावकार्य

अपघाताची माहिती मिळताच ११२ क्रमांकावर संपर्क साधण्यात आला. गस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक देविदास चोपडे आणि पोलीस कर्मचारी पवन राऊत यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरीत पडलेले मृतदेह बाहेर काढणे कठीण ठरत होते. पोलीस निरीक्षक चोपडे यांनी पत्रकार इलियास बावाणी आणि गोपाल चव्हाण यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात पोहोचवले. शारदा कन्स्ट्रक्शनचे सुपरवायझर श्रीनिवास यांनी क्रेन उपलब्ध करून दिल्यानंतर दरीत कोसळलेला टेम्पोही बाहेर काढण्यात आला. वैद्यकीय पथक आणि १०८ रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी जखमींवर उपचार केले. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून पाहणी

उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार भोंडवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके, पोलीस हवालदार सत्यमल मडावी, पोलीस कर्मचारी संघरत्न सोनसळे आणि पवन राऊत, तसेच होमगार्ड एस. पी. भगत आणि मुरकुटे पुढील तपास करीत असल्याची माहिती आहे.