राज्य उत्पादन शुल्काची कारवाई; ८४ लाखांचा मद्यासह कंटेनर जप्त, एकाला अटक

सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य वाहतुकीविरोधात मोठी कारवाई केली आहे. पंढरपूर विभागाच्या पथकाने सांगोला तालुक्यातील अक्कलकोट गावच्या हद्दीत मिरज-सोलापूर महामार्गावरील टोलनाक्याजवळ कारवाई करत सुमारे ८४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, पुणे विभागाचे उपायुक्त सागर धोत्रेकर, अधीक्षक भाग्यश्री जाधव आणि उपअधीक्षक सोरंभ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दुय्यम निरीक्षक सोरंभ भोसले आणि त्यांच्या पथकाने कारवाई केली.

कंटेनरमध्ये अवैध मद्याचा साठा

कारवाईदरम्यान टाटा कंपनीचा सहा चाकी कंटेनर (एनएल ०२ एई ६८२३) ताब्यात घेण्यात आला. या कंटेनरमध्ये ४२ लाख ४८ हजार रुपये किमतीचे बनावट देशी मद्याचे १० मिली क्षमतेचे १०७१ बॉक्स आढळून आले. याशिवाय परराज्यातील विदेशी मद्याचा साठाही आढळला. त्यामध्ये १८० मिलीच्या ‘रॉयल स्टॅग’ व्हिस्कीचे १२ बॉक्स, एक मोबाईल आणि कंटेनरसह एकूण सुमारे ८४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कठोर कारवाईचा इशारा

या कारवाईबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी अवैध मद्य वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. ग्रामीण तसेच शहरी भागात अवैध मद्यविक्री आणि वाहतूक वाढत असल्याने संबंधितांविरोधात अजामीनपात्र कलमांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कारवाईत निरीक्षक पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक समाधान शेळके, राम निंबाळकर, बापू चव्हाण, श्रद्धा गड्डे, तसेच कर्मचारी विजय शेळके, विनायक वाळुंजकर, तानाजी जाधव, गजानन जाधव आदी सहभागी झाले होते.