केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी; सोयाबीन-तुरीच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी

सोलापूर जिल्ह्यातील खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती आणि पीक नुकसानीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाने बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे आणि पानगाव येथे प्रत्यक्ष शेतपाहणी केली. पावसाअभावी जळालेली सोयाबीनची पिके, तुरीची स्थिती तसेच पानगाव येथील पूर्णपणे कोरडा पडलेला साठवण तलाव यांची पाहणी करून पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधला. केंद्रीय पथकाचे नेतृत्व कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या पीक विभागाचे संचालक डॉ. के. पोन्नुसामी यांनी केले. पथकामध्ये पेयजल व स्वच्छता विभागाचे टीम लीडर अबसार अहमद खान आणि अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सहाय्यक संचालक सुमित शर्मा यांचा समावेश आहे. कृषी आयुक्त सूरज मांढरे हेदेखील पथकासोबत उपस्थित होते.

पावसाअभावी सोयाबीनचे पीक पूर्णपणे नष्ट

पानगाव येथे केंद्रीय पथकाने पावसाअभावी जळून गेलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी शेतकरी आनंद धनंजय मोरे यांच्याशी संवाद साधून पिकांची स्थिती, शेतीसाठी झालेला खर्च आणि अपेक्षित उत्पन्न याबाबत माहिती घेण्यात आली. चांगला पाऊस झाला असता तर सोयाबीनमधून हेक्टरी ५० ते ७० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असते. मात्र, पावसाअभावी पीक पूर्णपणे नष्ट झाले असून जळालेले सोयाबीन जनावरेही खात नसल्याचे मोरे यांनी पथकाला सांगितले.

पथकाने पानगाव येथील साठवण तलावाचीही पाहणी केली. तलाव पूर्णपणे कोरडा पडल्याचे निदर्शनास आले. बार्शी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची तीव्रता या परिस्थितीतून स्पष्ट होत असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने पथकाला देण्यात आली.

पीक खर्च, भूजल पातळी आणि चारा व्यवस्थेची माहिती

उपळाई ठोंगे येथे श्रीमती लता शेळवणे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली. त्यांचे बंधू कल्याण चव्हाण यांनी पथकाला पीक नुकसानीची माहिती दिली. चार एकर क्षेत्रात सोयाबीनचे पीक घेण्यासाठी प्रति एकर २० ते २५ हजार रुपये खर्च झाला. मात्र, पीक पूर्णपणे नष्ट झाल्याने उत्पादन मिळण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले. पथकाने पेरणीपासून झालेला पाऊस, पावसातील खंड, पिकांची वाढ, गावातील एकूण पेरणी क्षेत्र, सोयाबीन व इतर पिकांचे क्षेत्र, आंतरपीक पद्धती तसेच भूजल पातळी याबाबत माहिती घेतली. जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता किती आहे, याचीही माहिती पथकाने घेतली. चारा डेपो सुरू करणे किंवा चारा छावण्या उभारणे यापैकी कोणता पर्याय अधिक उपयुक्त ठरेल, याबाबत शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

दोन ते तीन दिवसांत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केंद्रीय पथकाला जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पीक नुकसानीची व्याप्ती आणि पाणीटंचाईबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील सर्व ११ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले असून सध्या १०८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पीक नुकसानीचे आतापर्यंत ६० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बार्शी तालुक्यात पावसाची मोठी तूट

बार्शी तालुक्यात १३८ गावे असून तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र १,५०,३१६ हेक्टर आहे. यंदाचे पेरणी क्षेत्र १,३६,५४६ हेक्टर असून सरासरी खरीप पेरणी क्षेत्र ७३,१७७ हेक्टर आहे. यंदा १,०१,०५६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

सोयाबीन, तूर आणि उडीद ही प्रमुख पिके असून द्राक्षे व कागदी लिंबू ही प्रमुख फळपिके आहेत. मात्र, सरासरी ५२८.१० मिमी पावसाच्या तुलनेत यंदा केवळ २९१.३४ मिमी पाऊस झाला असून ४४.८३ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. तसेच २१ ते ४४ दिवसांचा कोरडा कालावधी राहिल्याने बार्शी तालुक्यातील सर्व १३८ गावे आणि १,१२,२२६ हेक्टर क्षेत्र दुष्काळबाधित झाले आहे.

दुष्काळी नुकसानीची ७३,४२४ हेक्टर क्षेत्रावरील, म्हणजेच ६५.४२ टक्के क्षेत्राची स्पॉट पाहणी पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने केंद्रीय पथकाला दिली.

उद्या आणखी तीन तालुक्यांची पाहणी

केंद्रीय पथक उद्या उत्तर सोलापूर, मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यांतील दुष्काळी भागांची पाहणी करणार आहे. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान मिळालेली निरीक्षणे तसेच संबंधित विभागांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे केंद्र शासनाला अहवाल सादर केला जाणार आहे. या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर, उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, गटविकास अधिकारी विवेक जमदाडे, तहसीलदार एफ. आर. शेख, मृद व जलसंधारण विभागाचे रामचंद्र क्षीरसागर, तालुका कृषी अधिकारी संतोष कोल्हे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.