सराईत मोटारसायकल चोरट्याला अटक; सोलापूर तालुका पोलिसांकडून ९ दुचाकी हस्तगत

सोलापूर : सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मोठी कारवाई करत आंतरराज्यीय सराईत मोटारसायकल चोरट्याला अटक केली आहे. आरोपीकडून सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर आणि गुलबर्गा जिल्ह्यातून चोरीस गेलेल्या एकूण ९ मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. १ ऑक्टोबर २०२६ रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना, मुळेगाव तांडा येथे एक संशयित व्यक्ती मोटारसायकलसह फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव सत्यवान रामहरी भोसले (वय ३४, रा. पडसाळी, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) असे सांगितले. त्याच्याकडील मोटारसायकल मोहोळ येथून चोरी केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. यानंतर आरोपीला संबंधित गुन्ह्यात अटक करून पोलीस कोठडीत सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या माहितीवरून सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर आणि गुलबर्गा जिल्ह्यातून चोरीस गेलेल्या एकूण ९ मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, सहायक पोलीस उपनिरीक्षक विवेक सांजेकर तसेच धनराज गायकवाड, राहुल महिंद्रकर, नागेश वाघमोडे, शशिकांत कोळेकर, अनंत चमके, पैगंबर नदाफ, फिरोज बारगीर आणि निखिल पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.