दिवेआगर दुर्घटनेत मृत ४ जिवलग मित्रांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार; आळंदीत शोककळा
पिंपरी : दिवेआगर येथे समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या आळंदीतील
विद्यार्थ्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. एकत्र लहानाचे
मोठे झालेले आणि शाळा-कॉलेजमध्येही सोबत जाणारे तन्मय दत्तात्रय वहिले, कैवल्य
सतीश वासनकर, प्रणव रामदास बनसोडे आणि सुमीत तुकाराम आहिरे या चार जिवलग
मित्रांच्या पार्थिवावर आळंदीतील स्मशानभूमीत एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
चार मित्रांच्या चिता एकाच वेळी पेटल्या
तन्मय, सुमीत, कैवल्य आणि प्रणव हे
आळंदीत राहत असल्याने त्यांची घट्ट मैत्री होती. विनर्स क्लासेसमध्ये शिक्षण
घेणारे हे विद्यार्थी एकमेकांच्या कुटुंबीयांनाही परिचित होते. दिवेआगर येथे
सहलीला जाण्यापूर्वी त्यांनी पालकांची परवानगी घेतली होती. शुक्रवारी सकाळी
चौघांचे पार्थिव आळंदी येथे आणण्यात आले. काही वेळ पार्थिव घरी ठेवण्यात आल्यानंतर
अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेण्यात आले. चारही मित्रांच्या चिता एकाच वेळी
रचण्यात आल्याने परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले. मुलांच्या पार्थिवाचे
दर्शन घेताना त्यांच्या आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. तळहाताच्या
फोडाप्रमाणे वाढवलेल्या मुलांना गमावल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
केळगावमध्येही शोककळा
या दुर्घटनेत आळंदीजवळील केळगाव येथील सोहम तुकाराम भांडवलकर आणि
राजवीर युवराज वहिले यांचाही मृत्यू झाला. दोघेही जिवलग मित्र होते. त्यांच्या
पार्थिवावर शुक्रवारी सकाळी केळगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या
वेळी संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. कुटुंबीय आणि नातेवाईकांना धीर देण्यासाठी
ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यशवर अमरावतीत, कौस्तुभवर श्रीरामपुरात अंत्यसंस्कार
दिवेआगर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या यश किरण वानखेडे याच्यावर
अमरावती येथे, तर कौस्तुभ संदीप दौड याच्यावर श्रीरामपूर
येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघेही विनर्स अॅकॅडमीत शिक्षण घेत होते. शवविच्छेदनाची
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पार्थिव मूळ गावी नेले.
सुमीतला सहलीला जाण्याचा हट्ट
सुमीत तुकाराम आहिरे याला क्लासमधील मित्रांसोबत कोकणात सहलीला जायचे
होते. सुरुवातीला त्याच्या आई-वडिलांनी त्याला सहलीला जाण्यास नकार दिला होता.
मात्र, सुमीतने
सहलीला जाण्यासाठी आग्रह धरला. अखेर पालकांनी त्याला परवानगी दिली आणि मित्रांचे
संपर्क क्रमांकही घेतले. मात्र, सहलीला गेलेल्या सुमीतचा
दिवेआगर समुद्रातील दुर्घटनेत मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूच्या बातमीने
कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा आघात झाला.
कैवल्यच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
१८ वर्षीय कैवल्य वासनकर हा वासनकर कुटुंबाचा एकुलता एक मुलगा होता. मूळचे अमरावतीचे असलेले
वासनकर कुटुंब सध्या आळंदी येथे वास्तव्यास आहे. कैवल्यचे वडील नोकरीनिमित्त
गुजरातमध्ये असतात, तर त्याची आई शिक्षिका आहे. कैवल्यने दहावीमध्ये
चांगले गुण मिळवले होते. तो सध्या अकरावीत शिक्षण घेत होता. अभ्यासासोबतच तो
शिवगर्जना प्रतिष्ठान मंडळाशीही जोडलेला होता. त्याचा मित्र शंतनु सोळुंके याने
कैवल्यच्या आठवणी सांगताना तो मनमिळावू आणि मदतीला धावून जाणारा होता, असे सांगितले. त्याच्या जाण्याने मित्रपरिवारात मोठी पोकळी निर्माण
झाल्याची भावना त्याने व्यक्त केली.