रशियाचा युक्रेनवर ड्रोन हल्ला; कीव्हमध्ये २७ ठार, ५० निवासी इमारतींचे नुकसान

कीव्ह : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील लांब पल्ल्याच्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असतानाच युक्रेनची राजधानी कीव्हजवळ भीषण ड्रोन हल्ला झाला आहे. कीव्हच्या पश्चिम उपनगरातील मायला परिसरात एका कंपनीच्या आवारात रशियन ड्रोन कोसळल्यानंतर मोठी आग लागली. त्यानंतर परिसरात स्फोट झाल्याने मोठी जीवितहानी झाली.

हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू

युक्रेनच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. जखमींची संख्या मोठी असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये दिमित्रिवस्काचे महापौर तारास डिडिच यांचाही समावेश असल्याची माहिती कीव्ह प्रदेशाचे गव्हर्नर तिमूर तकाचेन्को यांनी दिली.

गोदामात स्फोटक वस्तू असल्याचा संशय

ड्रोन ज्या कंपनीच्या आवारात कोसळला, त्या ठिकाणी ‘स्फोटक वस्तू’ साठवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ड्रोनच्या धडकेनंतर लागलेल्या आगीत त्यानंतर स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. युक्रेनच्या सरकारी वकिलांनी या घटनेची चौकशी सुरू केली असून, सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष किंवा गुन्हेगारी निष्काळजीपणा झाला आहे का, याचा तपास केला जात आहे.

५० निवासी इमारतींचे नुकसान

हल्ल्यामुळे मायला आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे ५० निवासी इमारतींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. बचाव पथकांकडून मदत आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली.

दोन्ही देशांकडून हल्ल्यांमध्ये वाढ

गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनकडून एकमेकांवर लांब पल्ल्याच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये आग आणि स्फोटांच्या घटना घडत आहेत. युक्रेनच्या पंतप्रधान सर्गी कोरेत्स्की यांनी या घटनेवर तीव्र खेद व्यक्त केला. निवासी भागांच्या जवळ धोकादायक वस्तू साठवताना सुरक्षा मानकांचे पालन न केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले. रशिया-युक्रेन संघर्ष पाचव्या वर्षातही सुरू असून, अशा घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.