डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या पुढाकाराने सोलापुरात ‘प्रहार’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन; खासदार उज्ज्वल निकम यांची उपस्थिती
सोलापूर : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सरकारी वकील तथा खासदार उज्ज्वल निकम यांच्या कायदेशीर संघर्षाची कहाणी मांडणाऱ्या ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या चित्रपटाचे सोलापुरात मोफत विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले. सोलापूर ग्रीन मिशनचे संस्थापक डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या पुढाकाराने आयोजित या प्रदर्शनाला खासदार उज्ज्वल निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. या विशेष प्रदर्शनासाठी वकील, पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. २६/११ हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला न्यायालयीन प्रक्रियेत दोषी ठरवून शिक्षा मिळवून देण्यासाठी झालेल्या कायदेशीर संघर्षाचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.
भारतीय संविधानाची ताकद अधोरेखित करणारी कहाणी
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणातील न्यायालयीन लढ्यात उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुरावे, कायदेशीर प्रक्रिया आणि संविधानाच्या चौकटीत न्याय मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न या चित्रपटातून मांडण्यात आले आहेत. दहशतवादाविरोधातील न्यायालयीन संघर्षासोबतच उज्ज्वल निकम यांच्या कौटुंबिक आयुष्यातील भावनिक पैलूही चित्रपटात दाखवण्यात आल्याचे सांगण्यात आले. अभिनेता राजकुमार राव आणि ललित प्रभाकर यांच्या अभिनयामुळे हा चित्रपट चर्चेत आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रदर्शनाला सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल, डॉ. सूर्यप्रकाश कोठे, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, नगरसेवक प्रथमेश कोठे आणि उद्योजक रामभाऊ जगदाळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.यावेळी डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी उज्ज्वल निकम यांच्या कार्याचा गौरव केला. देशाच्या सुरक्षेसाठी आणि न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून दहशतवादाविरोधात लढा देणाऱ्या त्यांच्या योगदानाचा देशाला अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
‘भारतीय संविधानाची ताकद जगाला दाखवली’
खासदार उज्ज्वल निकम यांनी यावेळी २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यातील कायदेशीर लढ्याचा उल्लेख केला. अजमल कसाब याला न्यायालयीन प्रक्रियेतून शिक्षा मिळवून देताना भारतीय संविधान आणि न्यायव्यवस्थेची ताकद अधोरेखित झाल्याचे त्यांनी सांगितले.चित्रपट पाहिल्यानंतर महापौर विनायक कोंड्याल यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी चित्रपटाचे कौतुक केले. देशाच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा संघर्ष समजून घेण्यासाठी नागरिकांनी हा चित्रपट पाहावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या विशेष प्रदर्शनाचे उपस्थितांनी कौतुक केले.