पदवीधर आणि शिक्षक मतदारांशी तीन वेळा संपर्क; भाजपचा प्रचारात आघाडीचा दावा
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ.
स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या
प्रचारासाठी भारतीय जनता पार्टीने जोरदार मोहीम हाती घेतली आहे. प्रत्येक मतदाराशी
तीन वेळा संपर्क साधण्याचे उद्दिष्ट ठेवून भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते
प्रचारात सक्रिय झाले आहेत. या संपर्क मोहिमेमुळे प्रचारात आघाडी घेतल्याचा दावा
पक्षाकडून करण्यात येत आहे.
गृहभेटी आणि वैयक्तिक संपर्कावर भर
दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शहरात विविध ठिकाणी मतदारांशी संपर्क साधत आहेत. पत्रक वाटप, गृहभेटी आणि वैयक्तिक संवादाच्या माध्यमातून पदवीधर तसेच शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर पक्षाने भर दिला आहे.या भेटीदरम्यान महायुतीचे उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पदवीधर आणि शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी हे दोन्ही उमेदवार सक्षम असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. भेटीदरम्यान काही मतदारांनीही उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका मांडल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
शहरापासून बूथ स्तरापर्यंत प्रचार यंत्रणा सक्रिय
मतदारांशी तीन वेळा संपर्क साधण्याचे सूत्र निश्चित करून भाजपने प्रचाराचे नियोजन केले आहे. शहर स्तरापासून मंडल आणि बूथ स्तरापर्यंत पक्षाची यंत्रणा कार्यरत असून, विविध टप्प्यांमध्ये प्रत्येक मतदाराशी थेट संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.भाजपच्या मते, या नियोजनबद्ध प्रचारामुळे शहरात महायुतीच्या उमेदवारांसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या जागा जिंकण्यासाठी पक्षाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून, मतदारांपर्यंत पोहोचण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.