गॅस सिलिंडरच्या स्फोटात बंकलगीतील कोळी कुटुंबाचे घर जळून खाक; महादेव कोगनुरे यांनी घेतली भेट

दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी येथे गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे बसवराज गोविंद (ढोणज) कोळी यांच्या घराला आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले. या दुर्घटनेमुळे कोळी कुटुंबाचे मोठे नुकसान झाले असून, कुटुंबावर संकट ओढवले आहे. घटनेची माहिती मिळताच एम. के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे महाराष्ट्र हेड महादेव कोगनुरे यांनी तातडीने दखल घेत कोळी कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.

संकटग्रस्त कुटुंबाला मदतीचा हात

एम. के. फाउंडेशनच्या बंकलगी येथील काही सहकाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे या घटनेची माहिती महादेव कोगनुरे यांना दिली. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून संकटग्रस्त कुटुंबाला मदत मिळावी, या उद्देशाने ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली. त्यानंतर कोगनुरे यांनी तत्परतेने कुटुंबाची भेट घेऊन मदतीचा खारीचा वाटा उचलला.अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे कोळी कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. अशा कठीण प्रसंगी समाजातील दानशूर व्यक्तींनी आणि ग्रामस्थांनी एकजुटीने संकटग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

ग्रामस्थांची उपस्थिती

यावेळी बंकलगी येथील रेवण सिद्ध कोणदे, राजशेखर सगरे, काशप्पा गुरुजी, मंत्रीशे गुरुजी, भाग्यांण्णा दुषवंत, चंदू कोणदे आणि नागनाथ कोणदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.