सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेऊन राणी खुर्द यांचा प्रचाराचा प्रारंभ; पदवीधरांच्या हक्कांसाठी लढण्याचा संकल्प

सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेऊन राणी खुर्द यांचा प्रचाराचा प्रारंभ

सोलापूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार राणी खुर्द यांनी श्री सिद्धेश्वर मंदिरात आरती करून दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पदवीधरांच्या हक्कांसाठी आणि युवकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी लढण्याचा संकल्प व्यक्त केला.

रोजगार, गुणवत्तेला न्याय आणि शिक्षण विकासाला प्राधान्य

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट करताना राणी खुर्द यांनी रोजगार, गुणवत्तेला न्याय आणि शिक्षण क्षेत्राचा सर्वांगीण विकास या मुद्द्यांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. शिक्षण पूर्ण केल्यानंतरही अनेक युवकांना रोजगारासाठी संघर्ष करावा लागतो. शिक्षण आणि रोजगार यांच्यातील दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच पदवीधरांच्या समस्या प्रभावीपणे मांडण्यासाठी स्वतंत्र आवाज निर्माण करणे, हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणूक ही केवळ विजय मिळवण्याची लढाई नसून पदवीधरांच्या विश्वासाची जबाबदारी स्वीकारण्याची संधी आहे, असे मत खुर्द यांनी व्यक्त केले. मोठमोठी आश्वासने देण्याऐवजी पदवीधरांच्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करून त्यांच्या अपेक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अपक्ष उमेदवारीतून स्वतंत्र भूमिका मांडण्याचा निर्धार

अपक्ष उमेदवारीच्या माध्यमातून पदवीधरांच्या प्रश्नांवर स्वतंत्र भूमिका मांडण्याचा निर्धार राणी खुर्द यांनी व्यक्त केला. राजकीय पाठबळापेक्षा मतदारांचा विश्वास आणि कामातून निर्माण होणारी ओळख महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी पुणे विभागातील पदवीधर मतदारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. श्री सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेऊन सुरू झालेल्या या प्रचारातून त्यांनी श्रद्धा, विश्वास आणि पदवीधरांच्या प्रश्नांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली. त्यांच्या प्रचाराला पदवीधर मतदारांचा कितपत प्रतिसाद मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यावेळी सुजीत खुर्द, भावी डोके, विवेक भोसले, अभिषेक कलकेरी, विपुल कांबळे, विशाल गायकवाड, सागर कोल्हे, विनोद सोनवणे, रियाज शेख, शहानवाज शेख, विजय कोकणे, सचिन सलगर, गणेश मोठे, गणेश खुर्द आदी उपस्थित होते.