सोलापुरात ‘मत वाचवा–देश वाचवा’ अभियानांतर्गत काँग्रेसची रॅली; प्रणिती शिंदेंकडून भाजपवर आरोप
सोलापुरात ‘मत वाचवा–देश वाचवा’ अभियानांतर्गत काँग्रेसची
रॅली
सोलापूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार
देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘मत वाचवा–देश वाचवा’ (Vote
Bachao – Desh Bachao) अभियानांतर्गत सोलापूर शहर काँग्रेस
कमिटीच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले. खासदार प्रणिती शिंदे यांच्या
नेतृत्वाखाली आणि सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख
उपस्थितीत चार हुतात्मा पुतळा येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही रॅली
काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून मतदार याद्यांमधील कथित अनियमितता, मतचोरी आणि लोकशाहीवरील आघातांविरोधात काँग्रेसने आवाज उठवला.
मतदार याद्यांमधील फेरफाराचा आरोप
यावेळी खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला मतचोरीविरोधातील लढा
यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहील. महाराष्ट्र, हरियाणासह
विविध राज्यांतील मतदार याद्यांमध्ये भाजपने फेरफार केल्याचा आरोप त्यांनी केला.
मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेत भाजपच्या फायद्यासाठी फॉर्म क्रमांक ०६
मध्ये मनमानी पद्धतीने बदल करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
SIR प्रक्रियेच्या माध्यमातून १३ कोटी
पात्र मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप शिंदे यांनी
केला. मतदार यादीतून नाव वगळले गेल्यास सामान्य नागरिकांना आपले नागरिकत्व आणि
मतदानाचा हक्क सिद्ध करताना अडचणींचा सामना करावा लागतो. लोकशाहीत मतदानाचा अधिकार
महत्त्वाचा असल्याने मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता असणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या.
निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत असताना मुख्य
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही प्रणिती शिंदे यांनी केली.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी
मतदार याद्यांच्या मुद्द्याबरोबरच शिंदे यांनी
दुष्काळग्रस्त भागांतील परिस्थितीवरून सरकारवर टीका केली. अनेक भागांत
पंचनाम्यांची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, जनावरांसाठी पुरेशा चारा छावण्या उपलब्ध
नाहीत आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजनही नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित
केला. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळण्यास विलंब होत असताना सरकार नेमके काय करत
आहे, असा सवाल त्यांनी केला. शक्तिपीठ महामार्ग आणि समृद्धी
महामार्गासारख्या मोठ्या प्रकल्पांसाठी लाखो कोटींची टेंडर काढण्याऐवजी
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी का वापरला जात नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न
करता सरकारने त्यांना तातडीने भरघोस आर्थिक मदत जाहीर करून प्रत्यक्ष लाभ द्यावा,
अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी केली.
काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती
या रॅलीला संजय हेमगड्डी, अरिफ शेख, सुशीला
आबुटे, बाबा मिस्त्री, प्रा. नरसिंह
आसादे, प्रा. अशोक निंबर्गी, राहुल
वर्धा, श्रीशैल रणधीरे, जुबेरभाई
कुरेशी, गणेश डोंगरे, भीमाशंकर टेकाळे,
सागर उबाळे, तिरुपती परकीपंडला, नागनाथ कदम, युवराज जाधव, रुपेश
गायकवाड, विवेक कन्ना, वाहिद बिजापुरे,
महेश लोंढे, सुभाष वाघमारे, ॲड. करीमुन्निसा बागवान, सायमान गट्टू, प्रा. भोजराज पवार, हरुण शेख, रमेश
कैरमकोंडा, उदयशंकर चाकोते, देविदास
गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, दिनेश
म्हेत्रे, शिवशंकर आंजनाळकर, भरत जाधव,
बसवराज म्हेत्रे, अंबादास गुत्तीकोंडा,
ॲड. केशव इंगळे, अनिल मस्के, गणेश आप्पा नरोटे, गिरीधर थोरात, अशोक कलशेट्टी, शोएब महागामी, सैफन
शेख, इलियास शेख, रमेश फुले, लखन गायकवाड, ज्योती गायकवाड, रेखा
बिनेकर, पूजा चव्हाण, अनिता भालेराव
आणि धनलक्ष्मी देशमाने यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.