प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात राजेंद्र शिंदेंची चौकशी; ‘हत्येशी संबंध नाही’, शिंदेंचा दावा

ठाणे : शिवसेना (उबाठा) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू असून, या प्रकरणात शिवसेनेच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांचे पती आणि पक्षाचे विभागप्रमुख राजेंद्र शिंदे यांची ठाणे गुन्हे शाखेकडून सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. या हत्या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा राजेंद्र शिंदे यांनी चौकशीदरम्यान केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात ही चौकशी झाली. उपायुक्त अमरसिंग जाधव आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी शिंदे यांच्याकडे विचारपूस केली.

‘प्रभागातील कामांमुळे आरोपींशी परिचय’

राजेंद्र शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, संतोष कनोजिया उर्फ टल्ली, निखिल यादव आणि सुभाष शिंदे उर्फ पप्प्या हे मानपाडा आणि मनोरमानगर परिसरात वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांचा काही वर्षांपासून परिचय असून, प्रभागातील विविध कामांच्या निमित्ताने आरोपी भेटले असावेत, असे शिंदे यांनी सांगितल्याचे पोलिस सूत्रांनी नमूद केले. दरम्यान, शिंदे काही आरोपींसोबत सीसीटीव्ही चित्रणात दिसत असल्याचा मुद्दा पूर्णेकर कुटुंबीयांनी उपस्थित केला होता. याबाबत पोलिसांनी शिंदे यांच्याकडे विचारणा केली. मात्र, आरोपींशी परिचय असणे आणि हत्या प्रकरणात सहभाग असणे या वेगळ्या बाबी असल्याचे सांगत शिंदे यांनी या प्रकरणातील सहभाग नाकारल्याची माहिती आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी निखिल यादव आणि संतोष कनोजिया यांनीही राजेंद्र शिंदे आपल्या प्रभागातील असल्याचे सांगत, त्यांचा या घटनेशी संबंध नसल्याचा दावा केला आहे. या प्रकरणातील तपास सुरू असल्याने राजेंद्र शिंदे यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हत्या प्रकरणात पाच आरोपींना अटक

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सुभाष शिंदे उर्फ पप्प्या, निखिल यादव, नितेश पवार, संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि अमित सिंह या पाच जणांना अटक केल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपींसोबत राजेंद्र शिंदे यांची बैठक झाल्याचे प्रदीप पूर्णेकर यांचे भाऊ जयनाथ पूर्णेकर यांनी पाहिल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितल्याची माहिती आहे. या दाव्याच्या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणा संबंधित व्यक्तींची चौकशी करत आहे.

नितेश पवार आणि निखिल यादव यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

पोलिसांनी आरोपी नितेश पवार आणि निखिल यादव यांना बुधवारी ठाणे न्यायालयात हजर केले होते. या दोघांची चौकशी करण्यासाठी एका दिवसाच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. राजेंद्र शिंदे यांची चौकशी सुरू असल्याने या टप्प्यावर दोन्ही आरोपींची चौकशी आवश्यक असल्याचा युक्तिवाद पोलिसांनी न्यायालयात केला. मात्र, आरोपींच्या वकिलांनी पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचे सांगत विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पोलिस कोठडीची मागणी फेटाळली आणि नितेश पवार व निखिल यादव यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले. यापूर्वी सुभाष शिंदे यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणातील तपास पुढे सुरू असून, राजेंद्र शिंदे यांच्यावरील आरोपांबाबत आणि हत्या प्रकरणातील इतर बाबींविषयी अधिकृत निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.