‘एकत्र जीव देणार होतो, माझी हिंमत झाली नाही’; प्रियकराच्या जबाबानंतर कोल्हापुरातील २३ वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे गूढ उकलण्यास सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यातील नायकवाडी धबधब्याजवळ २३ वर्षीय इंजिनिअरिंग
विद्यार्थिनीचा मृतदेह सुमारे १ हजार फूट खोल दरीत आढळल्यानंतर या प्रकरणाला वेगळे
वळण मिळाले आहे. या प्रकरणी तिचा २५ वर्षीय प्रियकर श्रीपाद वडार याला पोलिसांनी
अटक केली असून, विद्यार्थिनीला कड्यावरून ढकलून तिची हत्या केल्याचा
संशय व्यक्त करण्यात आला आहे.
तरन्नुम नाईक ही इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती आणि गरगोटी
येथे आजीसोबत राहत होती. शनिवारी श्रीपाद वडार याने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन
तरन्नुम कड्यावरून दरीत पडल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी
पोहोचले आणि दुर्गम भागातून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
साडेपाच वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा दावा
पोलिसांच्या माहितीनुसार, श्रीपादने तरन्नुमसोबत साडेपाच वर्षांपासून
प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. तरन्नुमच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या
व्यक्तीसोबत ठरवल्यामुळे दोघे अस्वस्थ होते, असा दावा त्याने
पोलिसांकडे केला. दोघांनी एकत्र जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता. तरन्नुमने
दरीत उडी घेतली; मात्र ऐनवेळी आपली हिंमत झाली नाही, असा जबाब श्रीपादने दिल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांनी
सांगितले.
निर्जन ठिकाणी दोघे गेले होते
नायकवाडी धबधबा गरगोटीपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर घनदाट जंगल
परिसरात आहे. पावसाळ्यानंतर धबधबा कोरडा पडला होता. शुक्रवारी श्रीपाद आणि तरन्नुम
या परिसरात गेले असताना तेथे अन्य पर्यटक उपस्थित नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्रकरणाच्या सुरुवातीला चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवल्याच्या आरोपावरून भारतीय
न्याय संहितेच्या कलम १४०(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पुढील
तपासात दोघांमधील मेसेजेसची माहिती पोलिसांच्या हाती आल्यानंतर श्रीपादच्या
जबाबाबाबत संशय निर्माण झाला.
चॅट हिस्ट्रीमुळे तपासाला वेगळे वळण
पोलिसांनी तपासादरम्यान तरन्नुम आणि श्रीपाद यांच्यातील चॅट हिस्ट्री
तपासली. आत्महत्या करण्याच्या कथित निर्णयाला या चॅटमधून दुजोरा मिळत नसल्याचे
पोलिसांनी सांगितले. तरन्नुमचे लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत ठरवल्यामुळे श्रीपाद
अस्वस्थ होता, असे मेसेजमधून दिसून आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि श्रीपादविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम
१०३(१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी जप्त
पोलिसांनी तरन्नुम आणि आरोपी श्रीपाद या दोघांचे मोबाईल फोन जप्त केले
असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच शवविच्छेदन अहवालाचीही
पोलिसांकडून प्रतीक्षा करण्यात येत आहे. आरोपी श्रीपाद हा गरगोटीचा रहिवासी असून
आपल्या स्थानिक कंत्राटदार भावासोबत काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
लग्नाच्या महिनाभर आधी तरुणीचा मृत्यू
तरन्नुमचे लग्न १२ नोव्हेंबर रोजी निश्चित झाले होते. लग्नाला अवघा
महिना बाकी असताना तिचा मृत्यू झाल्याने कुटुंबीय आणि परिसरात हळहळ व्यक्त होत
आहे. तरन्नुमवर तिच्या मूळ गावी पाटगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या
मृत्यूनंतर गरगोटीमध्ये नागरिकांनी निषेध व्यक्त केला. रविवारी रहिवाशांनी पोलीस
ठाण्यावर मोर्चा काढून या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात घेण्याची मागणी
केली. या प्रकरणाचा पुढील तपास कोल्हापूर पोलिसांकडून सुरू असून, शवविच्छेदन
अहवाल, मोबाईलमधील चॅट आणि फॉरेन्सिक तपासातून मृत्यूचे
नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.