उज्जैनच्या महाकाल मंदिर परिसरात चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती; १३ भाविक जखमी
श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी उज्जैनच्या महाकाल मंदिर
परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली.
महाकाल मंदिरातील हरसिद्धी मंदिरासमोरील बॅरिकेड परिसरात अचानक गर्दीचा दबाव
वाढला. गर्दीच्या दबावामुळे काही भाविकांची प्रकृती बिघडली, तर काही जण बेशुद्ध पडल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक माहितीनुसार,
या घटनेत जवळपास १३ भाविक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी
रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा रक्षकांनी गर्दीत
अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. परिस्थिती नियंत्रणात
आणण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या.
दरम्यान, महाकाल मंदिर प्रशासनाने मंदिर परिसरात
मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. आज श्रावणाचा
तिसरा सोमवार असल्याने मध्य प्रदेशासह देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने
भाविक उज्जैनमध्ये दाखल झाले आहेत. त्यातच नागचंद्रेश्वर मंदिराचे दरवाजे
वर्षातून केवळ एकदाच उघडले जात असल्याने दर्शनासाठी भाविकांची गर्दी आणखी
वाढली.
आतापर्यंत सुमारे ५ लाख ५० हजार भाविकांनी महाकालाचे
दर्शन घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी बिहारमधील अशोक धाम मंदिर परिसरातही गर्दीमुळे चेंगराचेंगरीची
घटना घडली. त्यामुळे श्रावणातील वाढत्या भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर
मंदिर परिसरातील सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.