गोकुळ संघर्ष मोर्चातील बॅनरची चर्चा; ‘गोकुळसाठी रडीचा डाव, विधानसभेसाठी काय केलं असेल?’ असा सवाल

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या कारभारात शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयावरून कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापले आहे. या निर्णयाविरोधात आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. ९ नोव्हेंबर) राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचा संघर्ष मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातील विविध बॅनर, फलक आणि अनोख्या आंदोलनाच्या माध्यमांनी लक्ष वेधून घेतले.

म्हशींच्या गळ्यात बॅनर; ‘गोकुळ वाचवा’चा संदेश

दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग होता. आंदोलनात म्हशींचाही सहभाग पाहायला मिळाला. एका म्हशीच्या गळ्यात ‘मला पण गोकुळवर संचालक म्हणून घ्या की’ असा मजकूर असलेला बॅनर लावण्यात आला होता. तर दुसऱ्या म्हशीच्या अंगावर ‘गोकुळ वाचवा’ असा संदेश लिहिण्यात आला होता. या अनोख्या पद्धतीने आंदोलकांनी शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदवला.

‘रडीचा डाव’ म्हणत सत्ताधाऱ्यांवर टीका

मोर्चातील काही बॅनरवरील मजकूर विशेष चर्चेत आला. ‘गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणारे विचार करा, यांनी विधानसभेसाठी काय काय केलं असेल?’ असा सवाल एका बॅनरमधून उपस्थित करण्यात आला. ‘लक्षात ठेवलंय २०२९, हे कोल्हापूर हाय’ अशा शब्दांत आगामी राजकीय निवडणुकीचा संदर्भ देत सत्ताधाऱ्यांना इशारा देण्यात आला. तसेच अटल बिहारी वाजपेयी यांच्या राजीनाम्याचा संदर्भ देत एका संचालकाच्या कमतरतेमुळे चार शासननियुक्त संचालक नेमण्याच्या निर्णयावरही टीका करण्यात आली.

काही बॅनरमधून गोकुळच्या निर्णयाची तुलना ब्रिटिश राजवटीशी करत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. हे सर्व मजकूर आंदोलकांकडून करण्यात आलेली राजकीय टीका आहे.

गोकुळमधील शासननियुक्त संचालकांच्या निर्णयाला विरोध

गोकुळ दूध संघाच्या २५ संचालकांच्या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने १३ जागा जिंकून बहुमत मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत कोरम पूर्ण न झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने चार संचालकांची नियुक्ती केली. या संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयाला समविचारी आघाडीने विरोध केला आहे. शासनाचा हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप करत अध्यादेश आणि राज्यपालांनी जारी केलेला वटहुकूम रद्द करण्याची मागणी आघाडीने केली आहे. यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे.

न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष

गोकुळच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता विशेष सभा होणार असल्याचे वृत्त आहे. त्यापूर्वीच शासनाने अध्यादेश जारी केल्याने वादाला अधिक तीव्रता आली आहे. या प्रकरणातील न्यायालयीन सुनावणी आणि निर्णयाकडे कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.