पंचकुलातील शाळेत धक्कादायक घटना; ८ वर्षीय मुलाकडून ६ वर्षीय चिमुकलीला दगड आणि फ्लॉवरपॉटने मारहाण
हरियाणातील पंचकुला येथील एका शाळेतून धक्कादायक घटना समोर आली आहे.
तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या आठ वर्षीय मुलाने त्याच शाळेतील केजीमध्ये शिकणाऱ्या
सहा वर्षीय चिमुकलीला दगड आणि फ्लॉवरपॉटने मारहाण केली. या हल्ल्यात मुलगी गंभीर
जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही
फुटेजही समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी मुलाच्या पालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले
आहे.
पंचकुलातील प्रतिष्ठित शाळेतील घटना
पंचकुला येथील संस्कृती मॉडेल स्कूलमध्ये ही घटना घडल्याचे समोर आले आहे. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आठ वर्षीय मुलगा सहा वर्षीय मुलीला वर्गात ओढत आणताना दिसत आहे. त्यानंतर त्याने मुलीचे डोके डेस्कवर आपटले आणि तिला जमिनीवर पाडून लाथा मारल्याचे दिसते. त्यानंतर दगड आणि फ्लॉवरपॉटने तिच्यावर हल्ला करण्यात आला. या मारहाणीत मुलगी बेशुद्ध पडली. ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असतानाही मुलाने तिला पुन्हा ओढण्याचा आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे वृत्त आहे. काही वेळानंतर तो वर्गातून बाहेर गेला.
आरोपी मुलानेच पालकांना दाखवली मुलगी
मुलीचे पालक तिला शाळेतून घेण्यासाठी आले असता आरोपी मुलानेच त्यांना
मुलगी पडलेल्या ठिकाणी नेले. त्यानंतर पालकांनी तिला तातडीने जवळच्या सिव्हिल
रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर दुखापतीमुळे तिला
चंदीगड येथील पीजीआय रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या तिची प्रकृती गंभीर असल्याचे
सांगण्यात येत आहे.
आरोपी मुलाच्या पालकांची चौकशी सुरू
या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपी मुलाच्या पालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. एवढ्या लहान वयातील मुलाकडून अशी हिंसक कृती कोणत्या कारणामुळे घडली, याचा तपास केला जात आहे. पीडित मुलीच्या काकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने आरोपी मुलाच्या वर्तनाबाबत शिक्षकांकडे तक्रार करण्याचे सांगितल्याने त्याने तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. यापूर्वीही आरोपी मुलाच्या आक्रमक वर्तनाबाबत तक्रारी आल्याचा दावा काकांनी केला आहे. त्याने कुत्र्यांना मारहाण केल्याच्या तक्रारीही असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता, देखरेख आणि लहान मुलांच्या वर्तनाकडे लक्ष देण्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.