उजनीतील एआय डेटा सेंटर प्रकल्पाच्या समर्थनार्थ सोलापूरकरांचे रास्ता रोको; रोहित पवारांविरोधात घोषणाबाजी

उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या एआय डेटा सेंटर प्रकल्पावरून सोलापूर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवत सोलापूर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते. या प्रकल्पामुळे पर्यावरण आणि धरणातील पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला होता. मात्र, रोहित पवार यांच्या विरोधानंतर सोलापुरात या प्रकल्पाच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. हा प्रकल्प उजनी धरण परिसरातच उभारण्यात यावा, या मागणीसाठी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.

आमदार, महापौरांसह नागरिकांचा सहभाग

या आंदोलनात आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल आणि भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यासह शहर व जिल्ह्यातील नागरिक, युवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी एआय डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध करणारे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

‘प्रकल्पामुळे सोलापूरचा विकास होईल’

आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, प्रस्तावित एआय डेटा सेंटर प्रकल्प सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. या प्रकल्पामुळे हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि सोलापूरची आयटी क्षेत्रातील ओळख निर्माण होण्यास मदत होईल, असा दावा आंदोलकांनी केला. केवळ राजकीय विरोधातून या प्रकल्पाला विरोध करणे योग्य नसल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली. हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत उजनी धरण परिसरातच उभारण्यात यावा, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. उजनीतील एआय डेटा सेंटर प्रकल्पावरून विरोध आणि समर्थन अशी दोन वेगवेगळी आंदोलने झाल्याने हा विषय आता जिल्ह्यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.