भाजपच्या मोर्चाच्या मार्गाला व्यापाऱ्यांचा विरोध; दिवाळी बाजारपेठेतून मोर्चा काढण्यावरून वाद
सोलापूर : सोलापूर शहरात भाजपच्या वतीने काँग्रेस पक्षाविरोधात ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ या मुद्द्यावर पश्चिम महाराष्ट्र विभागाचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, या मोर्चाच्या नियोजित मार्गावरून आता वाद निर्माण झाला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मोठी गर्दी असताना याच मार्गावरून मोर्चा काढण्यास व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. भाजपने जाहीर केलेल्या नियोजित मार्गानुसार हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाळीवेस, टिळक चौक, मधला मारुती मार्गे बसवेश्वर महाराज पुतळा असा जाणार आहे.
दिवाळी बाजारपेठेवर परिणाम होण्याची भीती
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर मोठी बाजारपेठ
भरली आहे. आकाशकंदील, फटाके, कपडे आणि
इतर दिवाळी साहित्याची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली आहेत. सणासुदीच्या
काळात या बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी होत असते. अशा वेळी मोर्चामुळे वाहतूक
आणि खरेदीवर परिणाम होऊन छोट्या व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त
केली जात आहे.
महेश धाराशिवकर यांचाही मोर्चाच्या मार्गाला विरोध
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष महेश धाराशिवकर यांनीही भाजपच्या मोर्चाच्या नियोजित मार्गाला विरोध दर्शवला आहे. याबाबत बोलताना महेश धाराशिवकर म्हणाले, "या मार्गावर दिवाळीनिमित्त मोठी बाजारपेठ भरते. वर्षातून एकदा येणाऱ्या या सणावरच छोट्या व्यापाऱ्यांचे संपूर्ण कुटुंब अवलंबून असते. अशा वेळी भाजपने जाणीवपूर्वक याच मार्गावरून मोर्चा काढून छोट्या व्यापाऱ्यांचे नुकसान करत आहे."भाजपने मोर्चाचा मार्ग बदलावा, अशी मागणीही धाराशिवकर यांनी केली आहे. त्यामुळे आता भाजप या विरोधाची दखल घेऊन मोर्चाचा मार्ग बदलणार का, याकडे व्यापारी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.