दयानंद महाविद्यालयात ‘भूपाळी ते भैरवी’ पहाट गाण्यांचा सुरेल सांस्कृतिक सोहळा संपन्न

सोलापूर : दयानंद शिक्षण संस्था, सोलापूर संचलित डी.बी.एफ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय व संलग्नित महाविद्यालये तसेच संकुलातील शाळांच्या सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने दीपावलीनिमित्त आयोजित ‘भूपाळी ते भैरवी’ या पहाट गाण्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि सुरेल वातावरणात संपन्न झाला. शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ५.४५ वाजता महाविद्यालयाच्या पोगुल मुक्तांगणात आयोजित या कार्यक्रमाने उपस्थित रसिकांना भारतीय संगीतपरंपरेचा समृद्ध आणि भावपूर्ण अनुभव दिला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. संतोष भंडारी हे उपस्थित होते. दयानंद शिक्षण संस्था स्वातंत्र्यपूर्व काळापासून शैक्षणिक उद्दिष्टांसोबतच भारतीय संस्कृती, कला आणि परंपरांचे जतन व संवर्धन करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. याच परंपरेला पुढे नेत संस्थेचे स्थानिक सचिव डॉ. महेश चोप्रा यांच्या कल्पक संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली ‘भूपाळी ते भैरवी’ या अनोख्या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळच्या प्रसन्न भूपाळीपासून ते सुरेल भैरवीपर्यंतचा संगीतप्रवास उपस्थितांसाठी आनंददायी आणि अविस्मरणीय ठरला.

कार्यक्रमात प्रसिद्ध कलाकारांनी अभंग, भक्तिगीते आणि लोकगीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. मराठी संतपरंपरेतील अभंगांचा वारसा जतन करणे, संगीतसंस्कृतीचे संवर्धन करणे आणि नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. पारंपरिक पिंगळा व वासुदेव यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात विशेष रंगत आणली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय संतोष भंडारी उपस्थित होते. दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक डॉ. व्ही. पी. उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. एस. बी. शिरसागर यांनी कार्य पाहिले. प्राचार्य बी. एच. दामजी, प्रा. डॉ. एस. व्ही. शिंदे, प्रा. एस. जे. गायकवाड, प्रा. डॉ. पी. आर. भोजे, उपप्राचार्य सौ. जगताप, मुख्याध्यापिका सौ. पाटील व सौ. कदम यांचे सहकार्य लाभले. संगीत शिक्षक श्री. रंजन पंचवाडकर आणि श्री. मनोज अंकुश यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली. सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. वीरभद्र दंडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. या अनुषंगाने दयानंद महाविद्यालयात संगीत, नाट्य व ललित कला महाविद्यालयाची सुरुवात करणार असल्याची घोषणा करण्यात आली. व यासाठी विविध भागातील सर्व वयोगटातील व्यक्तींना या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन करण्यात आले.

या सांस्कृतिक सोहळ्यास संस्थेतील सर्व प्राचार्य, संस्थाप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक, आजी-माजी विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि संगीतप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष आनंदाची बाब म्हणजे समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ, शेळगी परिसर, सोलापूरचे अध्यक्ष श्री. शिवलिंगप्पा शहाबादे आणि उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत (आण्णा) रमणशेट्टी यांची उपस्थिती लाभली. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. दयानंद शिक्षण संस्थेच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून भविष्यात संगीत व कला महाविद्यालय सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात येत आहे. गायन, वादन, नृत्य आणि विविध कला प्रकारांना प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे. ‘भूपाळी ते भैरवी’सारखे उपक्रम भारतीय संगीतपरंपरेचे संवर्धन करण्याबरोबरच नव्या पिढीला सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणारे आणि ज्येष्ठ व युवा पिढीतील सांस्कृतिक नाते दृढ करणारे ठरत आहेत.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दयानंद शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, संस्थाप्रमुख, प्राचार्य, सांस्कृतिक विभागाचे आयोजक, प्राध्यापक, कर्मचारीवृंद, सहभागी कलाकार आणि पडद्यामागे मेहनत घेणाऱ्या सर्वांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले. ‘भूपाळी ते भैरवी’ हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून भारतीय संगीतसंस्कृतीचा सुरेल, भावपूर्ण आणि अविस्मरणीय सोहळा ठरला.