‘गोकुळ’मध्ये सत्तेसाठी कायदा बदलला, कोल्हापूरकरांचा अपमान केला; सतेज पाटलांचा सरकारवर आरोप
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने चार तज्ज्ञ संचालक नियुक्त करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या निर्णयावरून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकार आणि महायुतीवर जोरदार टीका केली आहे. दूध उत्पादकांनी महायुतीला नाकारून त्यांच्या पॅनेलला १३ जागांचे स्पष्ट बहुमत दिले असताना, जनादेश डावलून सत्तेसाठी कायद्यात बदल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी सरकारच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला. या निर्णयाच्या निषेधार्थ सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा ‘कोल्हापूरचा स्वाभिमान महामोर्चा’ काढण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
‘गोकुळ अमूलच्या घशात घालण्याचा प्रयत्न
आहे का?’
सतेज पाटील म्हणाले की, गोकुळच्या निवडणुकीत कोल्हापूरच्या दूध उत्पादकांनी महायुतीला नाकारून त्यांच्या पॅनेलला १३ जागांचे बहुमत दिले. मात्र, निवडणुकीचा निकाल विरोधात गेल्यानंतर नवा कायदा करून सत्तेत बसण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणूक पार पडल्यानंतर निकालाच्या विरोधात कायदा लागू करणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी हा निर्णय कोल्हापूरकरांचा आणि साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे म्हटले. कायद्याचा आधार घेऊन गोकुळ संस्था बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. गोकुळ अमूलच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
‘पहिल्या बैठकीला उपस्थित राहिले असते तर
अध्यक्ष निवड झाली असती’
गोकुळच्या पहिल्या बैठकीचा संदर्भ देताना पाटील यांनी महायुतीच्या १२ संचालकांच्या अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित केला. हे संचालक बैठकीला उपस्थित राहिले असते, तर त्यांच्या आघाडीचा अध्यक्ष त्याच दिवशी निवडून आला असता, असा दावा त्यांनी केला. मात्र, जाणीवपूर्वक बैठकीला पाठ फिरवून कोरमचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही टीका केली. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याबाबत मुश्रीफ यांची भूमिका काय आहे, हे आपल्याला माहीत असल्याचे सांगत, मुख्यमंत्री यांना घाबरून ते आता काही बोलणार नाहीत, असा टोलाही पाटील यांनी लगावला.
‘उद्याच महापालिकेतही असाच प्रकार होईल’
गोकुळमधील निर्णयाचा परिणाम भविष्यात स्थानिक स्वराज्य
संस्थांमध्येही होऊ शकतो, अशी भीती सतेज पाटील यांनी व्यक्त केली.
आज गोकुळमध्ये जे घडत आहे, तेच उद्या महापालिकेतही घडवले जाऊ
शकते. पराभव समोर दिसल्यास स्वीकृत नगरसेवकांना महापौर निवडीत मतदानाचा अधिकार
दिला जाऊ शकतो, असा दावा त्यांनी केला. लोकशाहीची अशी थट्टा
यापूर्वी पाहिली नसल्याचेही ते म्हणाले.
‘न्यायालयात जाण्यापासून रोखण्यासाठी
अध्यादेशाला विलंब’
गोकुळमधील निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका सुरू असल्याचे सांगत पाटील यांनी अध्यादेश काढण्यास होत असलेल्या विलंबावरही प्रश्न उपस्थित केला. मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्यानंतर त्याचा अधिकृत अध्यादेश तातडीने का काढण्यात आला नाही, असा सवाल त्यांनी केला. न्यायालयात योग्य वेळी दाद मागता येऊ नये, यासाठी सरकारकडून जाणीवपूर्वक वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केल्यामुळे पडद्यामागे काय घडत आहे, याची आपल्याला कल्पना असल्याचेही पाटील म्हणाले. गोकुळमधील चार तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्तीचा निर्णय आणि अध्यक्ष निवडीवरून सुरू झालेला हा वाद आता रस्त्यावर उतरण्याची चिन्हे आहेत. ९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या स्वाभिमान महामोर्चाकडे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.