सोलापुरात भाजपचा काँग्रेसविरोधात भव्य मोर्चा; हजारो कार्यकर्त्यांच्या सहभागाने शहर भगवामय

सोलापूर : पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या वतीने काँग्रेसच्या विरोधात आणि ‘लोकतंत्र बचाव – अराजकता हटाव’ या मुद्द्यावरून सोलापूर शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात पश्चिम महाराष्ट्रातील हजारो भाजप कार्यकर्त्यांनी सहभाग घेतल्याने शहरातील वातावरण भगवामय झाले होते. या मोर्चाचे नियोजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले होते. त्यांच्या नियोजनामुळे मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले.

भाजपचे दिग्गज नेते आणि पदाधिकारी सहभागी

मोर्चामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार राजेंद्र राऊत, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, रंजीता चाकोते, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, शहाजी पवार, राम सातपुते, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्यासह भाजपचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाळीवेस, टिळक चौक, मधला मारुती मार्गे कौतम चौक असा प्रवास करत मोर्चा जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला. येथे मोर्चाचा समारोप करण्यात आला. मोर्चाच्या संपूर्ण मार्गावर कार्यकर्त्यांनी ‘लोकतंत्र बचाव’, ‘काँग्रेस हटाव – देश बचाव’ आणि ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या.

व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून विशेष नियोजन

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोर्चाच्या मार्गावरील बाजारपेठेत मोठी गर्दी होती. त्यामुळे सुरुवातीला या मार्गावरून मोर्चा काढण्यास विरोध झाला होता. मात्र भाजपने प्रशासनाशी समन्वय साधून आणि वेळेचे योग्य नियोजन करून मोर्चा शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडला. व्यापाऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, याची विशेष काळजी घेण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. या मोर्चाच्या माध्यमातून सोलापूर शहरात भाजपने मोठे शक्तिप्रदर्शन केले. हजारो कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे शहरातील भाजपच्या संघटनात्मक ताकदीचे दर्शन घडल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला.