एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर; १० हजार रुपये मिळणार, मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी समोर आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेत १० हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची घोषणा केली. कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांबाबत दिवाळीनंतर बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांचे तोंड गोड करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांनी प्रवाशांना वेठीस धरू नये, असे ते म्हणाले.

खासगी वाहनांकडून प्रवाशांची लूट; कारवाईचे आदेश

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा काही खासगी वाहनचालक गैरफायदा घेत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणाऱ्या खासगी वाहनचालकांवर आरटीओच्या माध्यमातून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून, कारवाई सुरू असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

संपाऐवजी चर्चेतून मागण्या मांडण्याचे आवाहन

एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना शक्य तेवढ्या सुविधा आणि आर्थिक लाभ देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातूनही कर्मचाऱ्यांना अधिकाधिक मदत देण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याची सरकारची तयारी आहे. मात्र, वारंवार संपाचे हत्यार उपसल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना त्रास होतो. त्यामुळे संपाऐवजी चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

एसटी महामंडळावर १६० कोटींचा आर्थिक ताण

एसटी महामंडळावर या महिन्यात सुमारे १६० कोटी रुपयांचा आर्थिक ताण असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. महामंडळाची आर्थिक परिस्थिती आव्हानात्मक असली, तरी एसटी कर्मचारीच महामंडळाचे उत्पन्न मिळवून देतात. त्यामुळे त्यांच्या हितासाठी आवश्यक खर्च करण्यास सरकार तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एसटी महामंडळातील सुमारे ८३ हजार कर्मचाऱ्यांच्या घरात दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशीही महायुती सरकार ठामपणे उभे असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

एनसीएमसी कार्डबाबतही तक्रारी

बैठकीत नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) संदर्भातील प्रश्नांवरही चर्चा झाल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. या कार्डमुळे महिला प्रवाशांची संख्या कमी झाल्याचा आणि त्याचा एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचा दावा त्यांनी केला. आतापर्यंत सुमारे १ कोटी ४० लाख प्रवाशांनी एनसीएमसी कार्ड घेतल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या निकषांनुसार ही व्यवस्था पुढे न्यावी लागत असली, तरी कार्डच्या वापरात येणाऱ्या अडचणी आणि तक्रारींवर उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एसटी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर झाल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, इतर प्रलंबित मागण्यांवर दिवाळीनंतर होणाऱ्या बैठकीत काय निर्णय घेतला जातो, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.