ICUमध्ये उपचार घेत असलेल्या तरुणीचा विनयभंग; सोलापुरातील नामांकित हॉस्पिटलच्या सफाई कर्मचाऱ्यावर गुन्हा
सोलापूर शहरातील एका नामांकित मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी
दाखल झालेल्या तरुणीचा अतिदक्षता विभागात विनयभंग केल्याचा आरोप झाल्याने खळबळ
उडाली आहे. कर्नाटकातील विजयपूर येथून उपचारासाठी आलेल्या या तरुणीवर रुग्णालयातील
सफाई कर्मचाऱ्याने गैरकृत्य केल्याची तक्रार करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, संबंधित
तरुणी आजारी असल्याने उपचारासाठी सोलापुरातील रुग्णालयात दाखल झाली होती. तिच्यावर
अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना तेथे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याने
तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून विशाल
शिवाजी कांबळे (वय ३५, रा. लष्कर, सोलापूर)
याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसांना माहिती
घटना समोर आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने प्राथमिक चौकशी करून
पोलिसांना माहिती दिल्याचे सांगितले आहे. पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य केले जात
असून, चौकशीत
समोर येणाऱ्या तथ्यांनुसार संबंधितावर कारवाई केली जाईल, अशी
भूमिका रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केली. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर हिंदवी
सेनेचे सुधीर बहिरवाडे यांनी रुग्णालयात जाऊन संबंधित प्रकाराबाबत जाब विचारल्याचे
वृत्त आहे.
गुन्हा दाखल होताच आरोपी पसार
गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच संबंधित सफाई कर्मचारी घटनास्थळावरून पसार झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. एमआयडीसी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील रुग्ण आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पीडित तरुणीचे नातेवाईकही कर्नाटकातून सोलापुरात दाखल झाले आहेत.