साताऱ्यात 19 वर्षीय हर्षदा जाधव हत्येचा उलगडा; वडील आणि चुलत चुलत्याला अटक
सातारा : खंडाळा तालुक्यातील शिरवळ-राजेवाडी मार्गावर 14 सप्टेंबर रोजी आढळलेल्या अनोळखी तरुणीच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात स्थानिक
गुन्हे शाखेला यश आले आहे. मृत तरुणीची ओळख हर्षदा हणमंत जाधव (वय 19, रा. जांभुळवाडी, हवेली तालुका) अशी पटली आहे. या
प्रकरणात हर्षदाची हत्या तिच्या वडिलांसह चुलत चुलत्याने केल्याचा आरोप असून,
पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
हॉटेलला नेण्याच्या बहाण्याने बाहेर नेले
पोलिसांच्या तपासानुसार, हर्षदाला हॉटेलमध्ये जेवायला जायचे
असल्याचे सांगून तिचे वडील हणमंत दामोदर जाधव आणि चुलत चुलते बाळू अंकुश जाधव यांनी
तिला वाहनातून बाहेर नेले. त्यानंतर तिच्या डोळ्यात व तोंडात चटणी टाकून, हाताने तोंड आणि नाक दाबून तिचा मृत्यू घडवून आणल्याचा घटनाक्रम तपासात
समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मृतदेह निर्जन ठिकाणी आढळला
14 सप्टेंबर रोजी शिरवळ-राजेवाडी
रस्त्याच्या कडेला निर्जन ठिकाणी एका अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळला होता. मृतदेह
संशयास्पद परिस्थितीत आढळल्याने सुरुवातीला शिरवळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची
नोंद करण्यात आली.मात्र, परिस्थिती संशयास्पद असल्याने
घातपाताच्या शक्यतेने तपास करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिल्या.
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून आरोपींपर्यंत पोहोचले
मृत तरुणीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडे सुरुवातीला कोणताही ठोस धागा नव्हता. त्यामुळे तपास पथकाने घटनास्थळापासून पुणे, भोर, कापूरहोळ, नसरापूर तसेच सातारा-पुणे महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच खबऱ्यांकडून माहिती घेण्यात आली आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित वाहनाचा माग काढण्यात आला. या तपासातून हर्षदाची ओळख पटवून संशयित आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.
दोघांना अटक; पुढील तपास सुरू
या प्रकरणात हणमंत दामोदर जाधव (रा. आंबेगाव खुर्द, ता. हवेली, जि. पुणे) आणि बाळू अंकुश जाधव (रा.
प्रगतीनगर-इंदोरी, तळेगाव दाभाडे, ता.
मावळ, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही
संशयितांविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना शिरवळ
पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हत्येमागील नेमके कारण आणि घटनेशी संबंधित
इतर बाबींचा पुढील तपास सुरू आहे.