आलिशान घर, विवाहित इंजिनिअरशी जवळीक अन् शेवटचा फोन कॉल; इन्फ्लुएंसर निधीच्या मृत्यूचा तपास सुरू

सिंगरौली : इन्फ्लुएंसर निधी तिवारीचा संशयास्पद मृत्यू

मध्य प्रदेशातील सिंगरौली येथे ३० वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर निधी तिवारी हिचा राहत्या घरात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. निधी खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स

निधी सोशल मीडियावर सक्रिय होती. तिच्या फेसबुक अकाउंटवर सुमारे ९.२८ लाख, तर इन्स्टाग्रामवर सुमारे ७.१२ लाख फॉलोअर्स असल्याचे सांगण्यात आले आहे. ती डान्सचे व्हिडिओ आणि रील्स सोशल मीडियावर शेअर करत होती. स्थानिक सौंदर्य स्पर्धेतही तिने सहभाग घेतला होता. २०२४ मध्ये तिने ‘मिस प्रिटी इंडिया’ हे विजेतेपद मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे.

विवाहित इंजिनिअरसोबत ओळखीचा कुटुंबीयांचा दावा

निधीची आई हेमलता तिवारी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, निधी मोरवा येथील एका रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. याच काळात तिची एनसीएलशी संबंधित एका आउटसोर्सिंग कंपनीत काम करणाऱ्या इंजिनिअरशी ओळख झाली. आईच्या दाव्यानुसार, दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. नंतर संबंधित इंजिनिअर विवाहित असून त्याला दोन मुले असल्याचे कुटुंबीयांना समजले. त्यानंतर निधीला त्याच्यापासून दूर राहण्यास सांगितल्याचे तिच्या आईने सांगितले.

मात्र, कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार दोघांचा संपर्क त्यानंतरही सुरू होता.

मृत्यूपूर्वी शेवटचा फोन कॉल कोणाला?

निधीच्या मृत्यूपूर्वी तिचे दुसऱ्या राज्यात राहणाऱ्या एका तरुणाशी फोनवर बोलणे झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. तिचा त्या व्यक्तीसोबत फोनवर काही वाद झाला होता का, याचाही पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी या फोन कॉलशी संबंधित माहिती आणि संबंधित व्यक्तीची भूमिका तपासण्यास सुरुवात केली आहे.

कुटुंबासाठी बांधत होती आलिशान घर

आईच्या म्हणण्यानुसार निधी कुटुंबातील मोठी मुलगी होती आणि तिने कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली होती. ती बैढन येथे कुटुंबासाठी घर बांधत होती. तिच्या कुटुंबीयांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी ती प्रयत्नशील असल्याचे तिच्या आईने सांगितले. भविष्यात चित्रपटसृष्टीत काम करण्याचेही तिचे स्वप्न होते.

पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात आहेत

निधीच्या आईने केलेल्या दाव्यांची अद्याप स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. त्यामुळे पोलिसांकडून प्रकरणाच्या विविध बाजूंचा तपास केला जात आहे. घटनास्थळावरील परिस्थिती, निधीचे फोन कॉल, तिचे शेवटचे संभाषण आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यातील परिस्थिती यांची माहिती पोलिसांकडून तपासली जात आहे.