मंगलसूत्र आणि जनावर चोरीतील सराईत गुन्हेगार जेरबंद; २ गुन्हे उघड

सोलापूर : माळशिरस तालुक्यातील लोंढा आणि गणेशनगर परिसरात धुमाकूळ घालून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवायांमध्ये आरोपींना ताब्यात घेत मंगलसूत्र व सोन्याचे दागिने तसेच जनावर चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. यातील एका आरोपीवर यापूर्वी सात गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सोन्याचे दागिने, रोख रक्कम चोरीला

माळशिरस तालुक्यातील लोंढा परिसरात घराच्या पाठीमागे झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणी व कानातील कर्णफुले चोरीला गेल्याची घटना घडली होती. तसेच गणेशनगर परिसरात शेळ्या व बोकडांची चोरी करण्यात आली होती. या घटनांची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली.

तेजस जाधवला ताब्यात घेतले

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे आणि त्यांच्या पथकाने संशयितांचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तसेच मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अकलूज येथून तेजस ऊर्फ दिल्या सोमणाथ जाधव याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ३१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.

सात गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार आरोपी अटकेत

दरम्यान, दुसऱ्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विजय चौक, अकलूज येथून दीपक रामा काळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

विशेष म्हणजे दीपक काळे हा मोहोळ, पंढरपूर तालुका आणि पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या सात गंभीर गुन्ह्यांमध्ये हवा असलेला सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत पोलीस हवालदार मनोज भंडारी, पंकज महिंद्रकर, सिद्धराम कंटोळी, व्यंकटेश मोरे, राहुल दोरकर, हरीश थोरात आणि बाळराजे घाडगे यांच्या पथकाने सहभाग घेतला.