अवघ्या 48 तासांत सोनं ₹5,500 ने महागलं; चांदीत ₹15,000 ची उसळी, जाणून घ्या आजचा भाव
नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी तेजी पाहायला
मिळत आहे. अवघ्या 48 तासांत सोन्याच्या दरात ₹5,500, तर चांदीच्या दरात तब्बल ₹15,000 प्रति किलोची वाढ झाली आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्या
ग्राहकांच्या खिशावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
सोन्याचा आजचा भाव किती?
पीटीआयच्या माहितीनुसार, दिल्लीच्या स्पॉट मार्केटमध्ये 99.9 टक्के शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा दर शुक्रवारी ₹1,200 ने वाढून ₹1,63,500 प्रति 10 ग्रॅम झाला. मागील व्यवहार सत्रात हाच
दर ₹1,62,300
होता. म्हणजेच गेल्या दोन व्यवहार
सत्रांचा विचार केला तर सोन्याच्या दरात एकूण ₹5,500 ची वाढ झाली आहे.
चांदीतही मोठी उसळी
चांदीच्या दरात तर आणखी मोठी
तेजी पाहायला मिळाली. शुक्रवारी चांदी ₹5,000 ने वाढून ₹2,50,000
प्रति किलो झाली. याआधी गुरुवारी चांदीच्या दरात
तब्बल ₹10,000 ची वाढ झाली होती आणि भाव ₹2,45,000 प्रति किलोवर बंद झाला होता.
त्यामुळे केवळ दोन व्यवहार
सत्रांत चांदी ₹15,000 ने महागली आहे.
सोनं-चांदी महागण्यामागे कारण
काय?
आंतरराष्ट्रीय बाजारातील
घडामोडींचा सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम होत आहे. अमेरिकन डॉलरमध्ये झालेली घसरण, अमेरिकन बाँड यिल्डमधील घट आणि जागतिक बाजारातील
अनिश्चितता यामुळे मौल्यवान धातूंना आधार मिळत आहे. याशिवाय अमेरिका आणि इराणमधील वाढता तणाव यासारख्या
भू-राजकीय घडामोडींमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत. त्यामुळे
सोन्याची मागणी वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही तेजी
जागतिक बाजारातही
सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. शुक्रवारी स्पॉट गोल्ड सुमारे 2 टक्क्यांनी वाढून 4,600.91 डॉलर प्रति औंस, तर चांदी जवळपास 3 टक्क्यांनी वाढून 69.87 डॉलर प्रति औंस झाली. आगामी काळात डॉलरची स्थिती, अमेरिकन बाँड यिल्ड, भू-राजकीय परिस्थिती आणि
गुंतवणूकदारांचा कल यावर सोन्या-चांदीच्या दरांची पुढील दिशा अवलंबून राहणार आहे.
दरम्यान, 48 तासांत सोनं ₹5,500 आणि चांदी ₹15,000 ने महागल्याने सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. तेजी
आणखी कायम राहणार की ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.