केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्याला दुचाकीस्वाराचा ओव्हरटेक; भरधाव वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुणे : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाहनांच्या ताफ्याला दुचाकीवरून ओव्हरटेक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शुभम विजय वनित (वय ३२, रा. नाना पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (१३ सप्टेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास शिवाजीनगर येथील संचैती चौकात हा प्रकार घडला. त्यावेळी पोलीस कर्मचारी ईश्वर लक्ष्मण भिकुले हे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सुरक्षेसाठी कर्तव्यावर होते. मोहोळ यांचा वाहनांचा ताफा चौकातून जात असताना शुभम वनित याने दुचाकी भरधाव आणि निष्काळजीपणे चालवत ताफ्याला ओव्हरटेक केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दुचाकी चालविण्याच्या पद्धतीमुळे रस्त्यावरील इतर वाहनचालक तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी संबंधित दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास सुरू

या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत. नेमक्या परिस्थितीचा आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा तपास करण्यात येत आहे.