सोलापूर विमानसेवा बंदच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे आंदोलन; विमानतळाबाहेर कागदी विमान उडवत निदर्शने
सोलापूर : सोलापूरमधील विमानसेवा बंद झाल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने विमानतळाच्या गेटसमोर आंदोलन करण्यात आले. खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. विमानसेवा पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी कागदी विमान उडवत निदर्शने केली. यावेळी प्रतिकृती विमानावर पंतप्रधान, पालकमंत्री, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री आणि राज्यमंत्री यांचे फोटो लावण्यात आले होते. आंदोलकांनी विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीसह सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
वारंवार विमानसेवा बंद होत असल्याचा आरोप
यावेळी बोलताना युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी सोलापूरची विमानसेवा वारंवार सुरू आणि बंद होत असल्याचा आरोप केला. विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर विमानतळाचे उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आले; मात्र त्यानंतर विमानसेवा सातत्याने सुरू-बंद होत असल्याचे त्यांनी म्हटले. विमानसेवा सुरू करण्यासाठी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात आली आणि त्याचा परिणाम हजारो कुटुंबांवर झाल्याचा आरोपही त्यांनी केला. विमानसेवेच्या प्रश्नावर सरकारकडून वारंवार आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात सेवा बंद झाल्याचे सांगत युवक काँग्रेसने सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.
सोलापूरची विमानसेवा तातडीने पूर्ववत करावी, अशी
मागणी यावेळी करण्यात आली. विमानसेवा पुन्हा सुरू न केल्यास आंदोलन अधिक तीव्र
करण्याचा इशाराही आंदोलकांकडून देण्यात आला.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
आंदोलनावेळी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन पवार, विनोद
पाटील, धीरज खंदारे, सुशिलकुमार
म्हेत्रे, योगेश रणधीरे, विवेक इंगळे,
अब्दुल हाफीज मुल्ला, प्रतीक शिंगे, चंद्रकांत नाईक, यासीन शेख, सोपान
मिसाळ, अमोल माशाळे, कृष्णा नाईक,
दिनेश डोंगरे, आरिफ मकानदार, अभिजीत गायकवाड, अभिषेक पवार, कुणाल
राठोड, श्रीनिवास मदरी, विलास राठोड,
कृष्णा राठोड, संदेश गायकवाड, गणेश शासम, अजीम शेख, साहिल
मुल्ला, तौसिफ शेख, सिद्धार्थ पाटील,
विजय कटकधोंड, योगेश गंगदे, अजय राजमाने यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित
होते.