जशी प्रवृत्ती तशी भाषा! ‘सरकारला नाही, अन्याय करणाऱ्यांना बोललो’; मनोज जरांगेंचा इशारा
उपोषणाचा १३वा दिवस; मुंबईत जाण्याचा निर्धार कायम
वडीगोद्री (जि. जालना) : मराठा आरक्षणाच्या मागणीच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटी येथे
मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असून, गुरुवारी उपोषणाचा १३वा दिवस आहे. प्रकृती स्थिर असली
तरी अशक्तपणा जाणवत असल्याचे सांगण्यात आले. पोळा सणानिमित्त राज्यातील शेतकरी आणि
समाजबांधवांना शुभेच्छा देत जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. सरकारने
शिष्टमंडळ पाठवायचे असल्यास पाठवावे, मात्र आपण कोणाचीही वाट
पाहत बसणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“आम्ही ठरल्याप्रमाणे मुंबईत जाणारच. १२ सप्टेंबरला
आंदोलनाची पुढील आरपारची दिशा जाहीर करणार,” असा
निर्धार त्यांनी व्यक्त केला.
‘शिकारीच्या वेळेला जेवणाची सवड नसते’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी
भाऊबीजेनिमित्त जेवणाचे निमंत्रण दिल्याबाबतही जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. निमंत्रणाबद्दल
आभार व्यक्त करताना त्यांनी, भाऊबीजेच्या दिवशी बहिणीकडे साडी-चोळी घेऊन जाण्याची
इच्छा असल्याचे सांगितले. मात्र सध्या आपण आरक्षणाच्या हक्काच्या लढाईत असल्याचे
त्यांनी स्पष्ट केले.
“आज माझा समाज संकटात आहे आणि संपूर्ण समाजाचे भवितव्य
पणाला लागले आहे. त्यामुळे बहिणीने मायेची भावना आंदोलनाच्या बाजूने ठेवावी,” असे
आवाहन त्यांनी केले.
जात प्रमाणपत्र शिबिरांच्या हेतूवर जरांगेंचा सवाल
१० ते १७ सप्टेंबरदरम्यान गावोगावी सुरू करण्यात आलेल्या दाखले वाटप
शिबिरांवरही जरांगे यांनी प्रश्न उपस्थित केला. ही शिबिरे सध्या सुरू असलेले
आंदोलन थांबवण्यासाठी आहेत की भविष्यात मिळालेली प्रमाणपत्रे रद्द करण्याच्या
उद्देशाने आयोजित करण्यात आली आहेत, यावर लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलकांवर दाखल होणाऱ्या गुन्ह्यांबाबत समाजाने घाबरू नये, असे
आवाहनही त्यांनी केले. हक्काचे आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल आणि गुन्हे
दाखल झाले तरी मागे हटू नये, असे ते म्हणाले.
‘सरकारला नाही, अन्याय
करणाऱ्यांना बोललो’
आपल्या आक्रमक भाषेवर होत असलेल्या टीकेला उत्तर देताना जरांगे पाटील
यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
“मी सरकारला नाही, तर अन्याय
करणाऱ्या व्यक्तींना बोललो आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मराठ्यांची
फसवणूक केली तर मी गप्प बसणार नाही. मी कोणत्याही पक्षाचा नाही, केवळ माझ्या मराठा समाजाच्या बाजूने बोलणार आहे,” असे
त्यांनी म्हटले.
संजय शिरसाटांवर टीका
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पूर्वी आपण आदराने आणि गोड बोलत
होतो, असा
दावा करताना जरांगेंनी मंत्री संजय शिरसाट यांच्या मध्यस्थीमुळे दोघांमधील संबंध
बिघडल्याचे म्हटले.
“हे नेते पक्षाची तळी उचलतात, समाजाची
नाही,” अशी टीकाही त्यांनी केली.
बबनराव तायवाडे यांच्या भूमिकेवर आक्षेप
ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील
भूमिकेवरही जरांगे यांनी तीव्र आक्षेप घेतला. आरक्षण ५० टक्क्यांच्या पुढे कसे
गेले आणि १९९४ मध्ये आरक्षण कसे देण्यात आले, यावर तायवाडे यांनी जाहीरपणे भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली. मराठा आरक्षणाला विरोध करण्याच्या भूमिकेवरून
त्यांनी तायवाडे यांच्यावर टीका केली. दरम्यान, उपोषण सुरू
असतानाही मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पोळा सण परंपरेनुसार उत्साहात साजरा करावा,
असे भावनिक आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले.