मालमत्ता कर वसुलीला गती द्या; २० सप्टेंबरपर्यंत सर्व बिले वाटप करा – महापौर विनायक कोंड्याल

सोलापूर : महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने मालमत्ता कर वसुलीला गती देण्याचे निर्देश महापौर विनायक कोंड्याल यांनी दिले आहेत. मालमत्ता कर विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी महापौर कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कर निरीक्षकांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर, उपायुक्त सोनाली यादव, सहायक आयुक्त युवराज गाडेकर, सहायक आयुक्त विनोद कुलकर्णी यांच्यासह मालमत्ता कर विभागातील कर निरीक्षक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

२० सप्टेंबरपर्यंत सर्व बिले वाटप करण्याचे निर्देश

बैठकीत सोलापूर शहरातील मालमत्ता कर वसुली, चालू आर्थिक वर्षातील उत्पन्न, मागील वर्षाची थकबाकी, आतापर्यंत वितरित केलेली मालमत्ता कर बिले, प्रत्यक्ष जमा झालेला कर तसेच अद्याप वाटप न झालेल्या बिलांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक कर निरीक्षकाच्या कार्यक्षेत्रात किती बिले वितरित झाली आहेत, किती बिले प्रलंबित आहेत आणि उर्वरित बिले कधीपर्यंत वितरित केली जाणार आहेत, याची माहिती महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. २० सप्टेंबर २०२६ पर्यंत सोलापूर शहरातील सर्व प्रलंबित मालमत्ता कर बिले वितरित करावीत, असे स्पष्ट निर्देश महापौरांनी दिले. त्यानंतर कर वसुलीची कार्यवाही वेगाने सुरू करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.

एक लाखांपेक्षा अधिक थकबाकीदारांना नोटिसा

एक लाख रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता कर थकबाकी असलेल्या थकबाकीदारांना १६ सप्टेंबर २०२६ पर्यंत नोटिसा वाटप करून पूर्ण कराव्यात, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

थकबाकीदारांकडून कराची वसुली करण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई

ज्या कर निरीक्षकांच्या कार्यक्षेत्रात बिले वाटपाचे काम अपेक्षित प्रमाणात झालेले नाही किंवा थकबाकी वसुली अत्यल्प आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या कामगिरीची गांभीर्याने दखल घेतली जाणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. कामात सातत्याने हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमानुसार नोटीस देण्यासह आवश्यक ती कठोर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

मालमत्ता कर हा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत

महापालिकेच्या उत्पन्नाचा मालमत्ता कर हा प्रमुख स्रोत असल्याने त्याच्या वसुलीत कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नाही, अशी भूमिका महापौरांनी मांडली. नागरिकांना वेळेत बिले उपलब्ध करून देणे, थकबाकीदारांशी सातत्याने संपर्क साधणे आणि कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणे ही संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. नियमित करदात्यांना प्रोत्साहन देतानाच मोठ्या प्रमाणात थकबाकी असलेल्या मालमत्तांवर विशेष लक्ष केंद्रित करून थकीत कर वसूल करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी मालमत्ता कराची प्रभावी वसुली अत्यंत आवश्यक आहे. कामात दिरंगाई करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही,” असे महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केले.