दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBI कडे; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची माजी मॅनेजर दिशा सालियन यांच्या
संशयास्पद मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. या
प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) वर्ग करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या
आदेशानुसार CBI ने या प्रकरणी FIR नोंदवून
पुढील तपास करावा. तसेच आतापर्यंत मालवणी पोलिस ठाण्यात या प्रकरणाशी संबंधित जमा
झालेली सर्व कागदपत्रे आणि पुरावे तातडीने CBI कडे सोपवावेत,
असेही निर्देश देण्यात आले आहेत. दिशा सालियन यांचे वडील सतीश
सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील
सुनावणीनंतर न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण आदेश दिला.
वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली तपास
जून २०२० मध्ये मालाड येथील एका इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून
दिशा सालियन यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी CBI ने
वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, तसेच दिशा सालियन यांचे
वडील सतीश सालियन यांचा सविस्तर जबाब नोंदवावा, असे निर्देश
देण्यात आल्याची माहिती त्यांचे वकील निलेश ओझा यांनी दिली.
पुराव्यांच्या आधारेच कारवाई
या प्रकरणात तपासादरम्यान ज्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे आढळतील, त्यांच्यावरच
कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले
आहे. पुरावे नसलेल्या व्यक्तींना विनाकारण आरोपी बनवू नये, असेही
न्यायालयाने नमूद केले आहे. तपासानंतर CBI कडून नकारात्मक
अहवाल सादर झाल्यास त्यावर आक्षेप घेण्याचा आणि प्रोटेस्ट पिटिशन दाखल करण्याचा
अधिकार याचिकाकर्त्यांना राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात
आले आहे.
याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून गंभीर आरोप
याचिकाकर्त्यांचे वकील निलेश ओझा यांनी दिशा सालियन यांच्यावर सामूहिक बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा दावा केला. तसेच न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतरच शवविच्छेदन अहवाल मिळाल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि इतर व्यक्तींविरोधात संशय व्यक्त करण्यात आला होता, तरी त्यांच्याविरोधात FIR का नोंदवण्यात आली नाही, असा सवालही ओझा यांनी उपस्थित केला.
हत्येचा ठोस पुरावा नसल्याचा सरकारी वकिलांचा दावा
दरम्यान, दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात कोणावरही खटला
चालवण्यासाठी पुरेसा ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचे सरकारी वकील शिशिर हिरे यांनी
न्यायालयात सांगितले. दिशा यांनी आत्महत्या केली असावी किंवा त्या अपघाताने खाली
पडल्या असाव्यात, असा तपासाचा निष्कर्ष असल्याचे त्यांनी
नमूद केले. ऑक्टोबर २०२० मध्ये बंद करण्यात आलेली ADR चौकशी
सोशल मीडियावरील आरोपांनंतर पुन्हा सुरू करण्यात आली होती. मात्र, या चौकशीतही हत्येचा कोणताही ठोस पुरावा आढळला नसल्याचा दावा सरकारी
पक्षाने केला. तर दिशा सालियन प्रकरणातील याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा
युक्तिवाद शिवसेना (उबाठा) यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सुदीप पासबोला यांनी केला. आता
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBI
कडून केला जाणार असून, तपासातून नेमके काय
समोर येते याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.