प्रेयसीला लेकरासोबत पळवून आणलं; नवऱ्याने प्रियकरावर चाकूने सपासप वार करत केली हत्या, पुण्यात खळबळ
पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील सारोळा, ता. भोर येथे गुरुवारी रात्री एका तरुणाची धारदार
शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. महिला आणि एका लहान मुलासोबत पायी जात
असताना मागून आलेल्या हल्लेखोराने तरुणावर अचानक हल्ला केला. धारदार चाकूने
तरुणावर एकामागून एक वार करण्यात आले. गंभीर जखमी झाल्याने तरुणाचा घटनास्थळीच
मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
नेमकं काय घडलं?
गुरुवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास तरुण एका महिला आणि
लहान मुलासोबत रस्त्यावरून जात होता. यावेळी हल्लेखोराने मागून येत त्याच्यावर
हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक
ग्रामस्थांनी आरोपीचा पाठलाग केला. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांचे पथक
घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने संशयिताला ताब्यात घेण्यात
आले.
सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती
महामार्गालगतच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या घटनेचे दृश्य कैद झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याआधारे पुढील तपास सुरू आहे. हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाली, याचा तपास पोलीस करत आहेत. प्रेमसंबंध, पूर्ववैमनस्य किंवा कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला का, याचा तपास केला जात आहे. राजगड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.