“जो शिकत राहील, तोच जिंकेल”; IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांना PM मोदींचा यशाचा मंत्र
नवी दिल्ली : भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच IIT दिल्लीच्या ५७व्या पदवीदान समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित
राहिले. यावेळी त्यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना बदलत्या
तंत्रज्ञानाच्या युगात सतत शिकत राहण्याचा आणि नव्या संधींचा शोध घेण्याचा सल्ला
दिला. पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना आपली उत्सुकता आणि शिकण्याची
वृत्ती कायम जिवंत ठेवण्याचे आवाहन केले. जगभरातील तंत्रज्ञानाचा वेग
झपाट्याने वाढत असून, भविष्यातील आव्हानांचे संधींमध्ये
रूपांतर करण्याचे धैर्य तरुणांनी दाखवावे, असे त्यांनी
सांगितले. तंत्रज्ञानामुळे जागतिक सत्तासंतुलन वेगाने बदलत असल्याचे सांगताना मोदी
म्हणाले की, पुढील २० ते ३० वर्षांत जगाचे स्वरूप कसे असेल,
हे निश्चितपणे सांगता येणार नाही. मात्र, “जो
शिकत राहील, तोच जिंकेल” हे सत्य
कायम राहील, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील प्रगतीचाही
पंतप्रधानांनी उल्लेख केला. भारताने सेमीकंडक्टर निर्मितीच्या दिशेने पाऊल टाकले
तेव्हा काहींनी त्यावर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, आता देशातील पहिल्या सेमीकंडक्टर युनिटमध्ये प्रत्यक्ष उत्पादन सुरू
झाल्याचे त्यांनी सांगितले.
मायक्रोचिपपासून मोठ्या जहाजांपर्यंत विविध उत्पादने
भारतीय तरुणांच्या कौशल्यातून तयार होतील, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी
व्यक्त केला. भारत आर्थिक, तांत्रिक आणि औद्योगिक क्षेत्रात
आत्मनिर्भर होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी
३० ते ३५ वर्षांत तरुणांचे निर्णय आणि त्यांची कृती ‘विकसित
भारत’ या संकल्पनेला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका
बजावतील, असे मोदी म्हणाले.
या पदवीदान समारंभात ५८७ पीएचडी संशोधकांसह ३,००० हून अधिक पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. IIT दिल्लीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात सुरू करण्यात आलेल्या नव्या
उपक्रमांचेही पंतप्रधानांनी कौतुक केले. पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.