नगरसेवक रमेश म्हात्रेला हायकोर्टाचा दिलासा; राज्याबाहेर राहण्याची अट, आठवड्यातून ३ दिवस पोलिस ठाण्यात हजेरी
कल्याण-डोंबिवली : महापालिकेच्या डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले शिंदे
गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह सर्व आरोपींना मुंबई उच्च
न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने आरोपींना कडक अटी आणि शर्तींसह
जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, खटल्याचे आरोपपत्र दाखल होईपर्यंत सर्व आरोपींना
महाराष्ट्राबाहेर राहावे लागणार आहे. जामिनावर
सुटल्यानंतर रमेश म्हात्रे यांचा मुक्काम गोव्यात असणार आहे.
जामिनासाठी कडक अटी
रमेश म्हात्रे यांच्यासह आरोपींना गोव्यातील अंजुना पोलिस ठाण्यात
आठवड्यातून तीन दिवस हजेरी लावावी लागणार आहे. तसेच सर्व आरोपींचे पासपोर्ट
जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने घेण्यात
येणार असून, खटला सुरू झाल्यानंतर आरोपींनी न्यायालयीन प्रक्रियेत
सहकार्य करावे आणि विनाकारण पुढील तारखा मागू नयेत, असेही
न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
व्हीसीद्वारे हजेरीच्या मागणीवर न्यायालय नाराज
सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी आरोपींना व्हिडिओ
कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर राहण्याची परवानगी देण्याची मागणी केली. मात्र, यावर
न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
व्हीसीद्वारे हजेरी लावायची असल्यास त्यासाठी रीतसर अर्ज दाखल करावा, असे
न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे रमेश म्हात्रे आणि इतर आरोपींना
तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी जामिनाच्या अटींचे
काटेकोर पालन करावे लागणार आहे.