पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाच्या अहवालाचे प्रकाशन; जेष्ठ नागरिक व वधू-वर केंद्रासाठी महापालिकेकडून हॉल उपलब्ध
सोलापूर : पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाच्या स्थापनेपासून राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा चार वर्षांचा अहवाल सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते महापौर दालनात प्रकाशित करण्यात आला. यावेळी नगरसेवक प्रथमेश कोठे, नगरसेवक डॉ. अजय पोन्नम, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, यंत्रमाग संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम तसेच पद्मशाली शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष काशिनाथ गड्डम यांची प्रमुख उपस्थिती होती. संघाने गेल्या चार वर्षांत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, पूरग्रस्तांना अन्नधान्य मदत, वैद्यकीय शिबिरे, मतदार जनजागृती अभियान यांसह तब्बल ४८ सामाजिक उपक्रम राबविल्याची माहिती संघाचे उपाध्यक्ष अनिल कन्ना यांनी स्वागतपर भाषणातून दिली. यावेळी संघाच्या वतीने सर्व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
नगरसेवक डॉ. अजय पोन्नम यांनी संघाच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत संघाच्या मागणीनुसार वधू-वर केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शविली. नगरसेवक प्रथमेश कोठे यांनीही संघाच्या कार्याची प्रशंसा करत, युवकांपेक्षा सेवानिवृत्त नागरिकांचे समाजकार्य अधिक प्रेरणादायी असल्याचे सांगितले. तसेच संघासाठी कार्यालय व जेष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. अध्यक्षीय भाषणात महापौर विनायक कोंड्याल यांनी आमदार देवेंद्र कोठे यांचे सहकार्य आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आशीर्वादामुळे समाजसेवेची संधी मिळाल्याचे सांगितले. त्यांनी संघासाठी कार्यालय, जेष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रासाठी तसेच वधू-वर केंद्रासाठी जुन्या घरकुल परिसरातील महापालिकेची जागा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. तसेच संघाच्या चार वर्षांच्या अहवालाचे कौतुक करत त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमास संघाचे कार्याध्यक्ष सुरेश श्रीराम, अध्यक्ष श्रीहरी कुरापाटी, सहसचिव सत्यनारायण बरदेपूर, खजिनदार उमापती मिठ्ठापल्ली, कार्यकारी सदस्य अंबादास इंदापुरे, श्रीनिवास वल्लाकाटी, अनिलकुमार जन्यारम, संगीता इंदापुरे, अरुणा कन्ना, वरलक्ष्मी गोटीपामूल, प्रमिला वडीशेरला, सुरेखा गोली, नागनाथ संभारम, नागनाथ वड्डेपल्ली, शाम बेनगिरी, वैकुंठम जडल, लक्ष्मीकांत दंडी, विजयकुमार चाटला आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी देविदास मेरगू, किसन आडम, अविनाश संगा, सुखदेव सग्गम, अनिल गंजी आणि श्रीनिवास बोलाबत्तीन यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन उपाध्यक्ष अनिल कन्ना यांनी केले, तर सचिव यशवंत इंदापुरे यांनी उपस्थित मान्यवरांचे तसेच महापौर विनायक कोंड्याल, नगरसेवक प्रथमेश कोठे आणि नगरसेवक डॉ. अजय पोन्नम यांचे संघाला जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.