सोलापूरकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी ‘थाळीनाद’ आंदोलन; दिवसभर कष्ट, रात्री पाण्यासाठी जागरण

सोलापूर : सोलापूर शहरातील विविध भागांत मध्यरात्रीनंतर होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दिवसभर कष्ट करणाऱ्या श्रमिक महिला आणि कुटुंबांना रात्री पाण्यासाठी जागून राहावे लागत असल्याचा आरोप करत अभिनव सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चार हुतात्मा पुतळ्याजवळ ‘थाळीनाद’ आंदोलन करण्यात आले. महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी आणि सोलापूरकरांचा पाणीप्रश्न मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री तसेच पाणीपुरवठा मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेच्या अध्यक्ष मीनलताई दास यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. शहरातील हद्दवाढ भाग, स्वागत नगर, शेळगी परिसर, कुमारस्वामी नगर, नेहरूनगर, स्मृती विहार, सिद्धेश्वर नगर, सोनामाता नगर यासह विविध भागांत मागील अनेक वर्षांपासून मध्यरात्री १२ वाजल्यानंतर पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणावर यंत्रमाग कामगार, विडी कामगार आणि अन्य श्रमिक वर्ग वास्तव्यास आहे. या भागातील अनेक महिला दिवसभर विडी वळण्याचे, नॅपकिन शिवण्याचे तसेच अन्य कष्टाचे काम करतात. दिवसभराच्या श्रमानंतर रात्री पुन्हा पाण्यासाठी जागावे लागत असल्याने महिलांसह वृद्ध, लहान मुले आणि संपूर्ण कुटुंबाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप

पाणीपुरवठ्याची वेळ नागरिकांच्या सोयीची नसल्याने श्रमिक महिला आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे आरोग्यावरही परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रश्नाबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन आणि दाद मागूनही अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले.

सोलापूरकरांना दिवसा आणि योग्य वेळी पाणी मिळाले पाहिजे,” या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याची वेळ बदलून दिवसा पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जोपर्यंत पाणीपुरवठ्याची वेळ बदलून दिवसा पाणी दिले जात नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आला. या आंदोलनात परिसरातील श्रमिक महिला, नागरिक आणि संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष मीनलताई दास, जिल्हा उपाध्यक्ष सरोजनी माकाई, जिल्हा कार्याध्यक्ष जयश्री हिरेमठ, शहराध्यक्ष जयश्री रानसरसे, शहर संघटक अरुणा जाधव, शहर उपाध्यक्ष अफ्रीन पटेल, शहर दक्षिण अध्यक्ष कविता ससाने, प्रभाग ८ अध्यक्ष सुनिता व्हनकेरी, स्वाती घंटे, योगेश्वरी निंबाळे यांच्यासह अन्य महिला आणि नागरिक उपस्थित होते.