FDAचा धडाका! IRCTC, इस्कॉनशी संबंधित कँटिनवर कारवाई; भेसळीविरोधातही मोठी मोहीम
मुंबई : अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या
आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. रेल्वे प्रवाशांना
अन्नपुरवठा करणाऱ्या IRCTC अंतर्गत बेस किचन आणि फूड
प्लाझांची तपासणी करण्यात आली. तपासणीत गंभीर त्रुटी आढळलेल्या पाच आस्थापनांचे
परवाने निलंबित करण्यात आले आहेत. कुर्ला येथील आर. के. असोसिएट, ओम साईराम एंटरप्रायजेस, अंबुज हॉटेल्स एक्स्प्रेस
फूड सर्व्हिस आणि मे. आरहा हॉस्पिटॅलिटी यांसारख्या बेस किचन आणि फूड प्लाझांवर
तपासणी करण्यात आली. या ठिकाणी झुरळांचा प्रादुर्भाव, उघड्यावर
ठेवलेले अन्न, अस्वच्छ स्वयंपाकघर, तुटलेल्या
फरशा आणि भिंतींना तडे अशा बाबी निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले.
इस्कॉनच्या तीन केंद्रांचे परवाने निलंबित
जुहू येथील **इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शिअसनेस
(इस्कॉन)**च्या तीन केंद्रांवरही FDAने कारवाई केली. या केंद्रांमध्ये अन्नसुरक्षा,
स्वच्छता, कच्च्या मालाची गुणवत्ता, कीटक नियंत्रण, कर्मचारी स्वच्छता, प्रशिक्षण आणि प्रयोगशाळा तपासणीसंदर्भात गंभीर त्रुटी आढळल्याचे
सांगण्यात आले. त्यामुळे तिन्ही केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले. याशिवाय
मुंबईतील इतर काही खाद्य आस्थापनांवरही कारवाई करण्यात आली. मालाड येथील झेप्टो,
बोरिवली पूर्वेकडील श्री मधुरम, मुलुंडमधील
कोठारी स्वीट्स, मुलुंड फरसाण मार्ट आणि गोरेगाव पूर्वेकडील
महाराष्ट्र बिर्याणी सेंटर यांचा त्यात समावेश आहे.
झेप्टो स्टोअरमध्येही गंभीर त्रुटी
मालाड येथील झेप्टो स्टोअरमध्ये प्रादुर्भाव, शीतसाखळीचा
भंग, अस्वच्छता तसेच कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता आणि
अन्नसुरक्षेच्या निकषांचे पालन न होणे अशा बाबी आढळल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे
संबंधित आस्थापनाचा परवाना निलंबित करण्यात आला.
कुर्ला बेस किचनला सुधारणा केल्यानंतर दिलासा
दरम्यान, कुर्ला येथील बेस किचनमध्ये आवश्यक सुधारात्मक
उपाययोजना पूर्ण करण्यात आल्याचे IRCTCकडून स्पष्ट करण्यात
आले आहे. निर्धारित मानकांनुसार सुधारणा करण्यात आल्यानंतर या किचनचे कामकाज
बुधवारपासून पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. इतर ठिकाणीही
आवश्यक सुधारात्मक उपाययोजना सुरू आहेत.
खारघरमधील मातेश्वरी मिल्कवरही कारवाई
खारघर येथील मातेश्वरी मिल्क सेंटरमध्ये दूध साठवणूक, तापमान
नियंत्रण, स्वच्छता, कीटक नियंत्रण,
कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक नोंदींमध्ये गंभीर त्रुटी
आढळल्या. पाश्चरायझेशनची सुविधा नसतानाही पाश्चराइज्ड दूध म्हणून पुरवठा केला जात
असल्याचे तसेच दुधाच्या प्रकाराबाबत ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता असल्याचे
तपासात आढळले. त्यामुळे FDAने या आस्थापनाचा अन्न व्यवसाय
परवाना तात्काळ निलंबित केला.