मनोज जरांगेंनी पुन्हा उपचार घेणं सोडलं; पाणी, सलाईन आणि तपासणीही नाकारली, सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

वडिगोद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून, शनिवारी या उपोषणाचा आठवा दिवस आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेतली असली तरी मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारपासून पुन्हा वैद्यकीय उपचार घेणे बंद केल्याची माहिती समोर आली आहे. पाणी, सलाईन तसेच वैद्यकीय तपासणीही त्यांनी नाकारल्याचे सांगण्यात येत आहे. मागण्यांची अंमलबजावणी झाल्यानंतरच उपचार घेणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

सरकारच्या आश्वासनांवर जरांगेंचा सवाल

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेतील आश्वासनांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. "सरकार 58 लाख नोंदी सुरू करतो म्हणाले. पण अजून त्याचं काम सुरू झालेलं नाही. हैदराबाद गॅझेटचं काम सुरू केलं नाही. गावात दवंडी पिटतो म्हणाले की, ते काही केलं नाही," अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली. हैदराबाद गॅझेटनुसार वैधता देण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारकडून ठोस निर्णयाची मागणी केली आहे. 2012 च्या जातपडताळणी कायद्यात हैदराबाद, सातारा आणि कोल्हापूर गॅझेटचा समावेश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाने दिल्याचे जरांगे यांनी सांगितले.

शिष्टमंडळाकडून अद्याप चर्चा का नाही?

हैदराबाद गॅझेटच्या वैधतेचा प्रश्न सोडविण्याबाबत शिष्टमंडळाने आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर शिष्टमंडळाकडून अद्याप चर्चा का करण्यात आली नाही, असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. मागण्यांवर प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत उपचार घेणार नसल्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे.

डॉक्टरांचे पथक दाखल; तपासणीस नकार

दरम्यान, शनिवारी सकाळी डॉक्टरांचे पथक उपोषणस्थळी दाखल झाले. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय तपासणी करून घेण्यास नकार दिल्याचे पाहायला मिळाले. उपोषणाचा आठवा दिवस सुरू असताना त्यांनी उपचार आणि तपासणी नाकारल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, आता सरकारकडून पुढील कोणती भूमिका घेतली जाते आणि मागण्यांवर काय निर्णय होतो, याकडे आंदोलनस्थळी उपस्थित मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.