सोलापुरात शिंदेंच्या शिवसेनेत धुसफूस; जुन्या-नव्या चेहऱ्यांवरून नाराजी, निष्ठावंत शिवसैनिक आक्रमक

सोलापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या सोलापूर शहर आणि जिल्हा कार्यकारिणीची पुनर्बांधणी आता चर्चेचा विषय ठरली आहे. कार्यकारिणी बरखास्त होऊन पाच महिन्यांहून अधिक काळ उलटला असतानाही नव्या पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, आगामी संघटनात्मक बांधणीसाठी हालचालींना वेग आला आहे. जिल्हा संपर्कप्रमुख खासदार धैर्यशील माने आणि खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नव्या कार्यकारिणीच्या नियुक्त्यांबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, संभाव्य पदाधिकाऱ्यांच्या नावांवरून पक्षातील जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

निष्ठावंत विरुद्ध उपरे’ संघर्षाची चिन्हे

युवासेनेचे पदाधिकारी सुजित खुर्द यांनी पत्रकार परिषद घेत पक्षातील नाराजीला वाचा फोडली. शिवसेनेत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या जुन्या शिवसैनिकांना संधी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. पक्षात नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांना मोठी जबाबदारी देण्यापूर्वी त्यांनी शिवसेनेची विचारधारा आणि संघटनात्मक कार्यपद्धती समजून घ्यावी, अशी भूमिका सुजित खुर्द आणि समी मौलवी यांनी मांडली.

तीन शहरप्रमुखांचा फॉर्म्युला चर्चेत

सोलापूर शहरातील संघटनात्मक वाद कमी करण्यासाठी एकाच शहरप्रमुखाऐवजी विधानसभा मतदारसंघनिहाय तीन स्वतंत्र शहरप्रमुख नियुक्त करण्याचा फॉर्म्युला चर्चेत असल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण सोलापूरसाठी माजी उपमहापौर राजेश काळे, सोलापूर शहर मध्यसाठी नगरसेवक प्रियदर्शन साठे, तर शहर उत्तरसाठी राजू आलूरे यांच्या नावांची राजकीय वर्तुळात चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यातील काही नावांना पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांकडून विरोध होत असल्याचे चित्र आहे.

अनुभवी नेत्यांना डावलल्याचा आरोप

नव्या चेहऱ्यांना संधी देताना पक्षासाठी दीर्घकाळ काम केलेल्या अनुभवी नेत्यांना डावलले जात असल्याची भावना काही शिवसैनिकांमध्ये आहे. सोलापूरमध्ये माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील आणि मनीष काळजे यांच्यासारखे अनुभवी नेते उपलब्ध असताना नवख्या चेहऱ्यांना महत्त्व दिल्यास संघटनेला त्याचा फटका बसू शकतो, असा इशारा नाराज कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.

सुजित खुर्द यांची वरिष्ठ नेत्यांना भेट घेण्याची तयारी

शहर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी पक्षातील अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी पदांसाठी मुलाखती दिल्या होत्या. २०१४ पासून संघटनात्मक पातळीवर काम करत असल्याचा दावा करत सुजित खुर्द यांनी आपल्याला आणि आपल्या कार्यकर्त्यांना अद्याप योग्य संधी मिळालेली नसल्याची नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांसह खासदार श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नव्या कार्यकारिणीसमोर नाराजी रोखण्याचे आव्हान

सोलापूर शिवसेनेची नवी संघटनात्मक रचना लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांपूर्वीच पक्षांतर्गत नाराजी समोर आल्याने नव्या नेतृत्वासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळणार की नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार, याकडे आता सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.