परवानगी नाकारली तरी लक्ष्मण हाके मुंबईकडे मोर्चा नेण्यावर ठाम; पाटस टोलनाक्यावर तणाव

पुणे : ओबीसी महाएल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पाटस टोलनाका परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असतानाही ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे मोर्चा मुंबईच्या दिशेने नेण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पाटस टोलनाक्यावर मोठा पोलिस बंदोबस्त

मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव पाटस टोलनाका परिसरात दाखल झाले आहेत. मोर्चेकऱ्यांकडून मुंबईच्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही मोर्चेकरी सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेतून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना अडवले.मोर्चेकऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू असून, पोलिसांकडून त्यांना रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मोर्चाला परवानगी नसल्याने दोन्ही बाजूंमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पोलिस अधीक्षकांकडून लक्ष्मण हाकेंशी चर्चा

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी पाटस टोलनाका परिसराला भेट दिली. त्यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, लक्ष्मण हाके हे मोर्चा मुंबईच्या दिशेने नेण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक रोखली

मोर्चेकऱ्यांनी मुंबईच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक काही काळ रोखून धरली आहे. त्यामुळे पाटस टोलनाका परिसरात वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. दरम्यान, मोठ्या संख्येने मोर्चेकरी उपस्थित असल्याने पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

पुढे काय होणार?

मोर्चाला पोलिसांची परवानगी नसताना लक्ष्मण हाके मुंबईच्या दिशेने मोर्चा नेण्यावर ठाम असल्याने प्रशासनासमोर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासन आणि मोर्चेकऱ्यांमध्ये चर्चा सुरू असून, पुढील काही वेळात मोर्चाबाबत कोणता निर्णय घेतला जातो आणि परिस्थितीवर काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.