दलितांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई नाही, राहुल गांधींवरच गुन्हा; सोलापूर शहर काँग्रेसचा भाजप सरकारविरोधात तीव्र निषेध
सोलापूर, : उत्तराखंडमधील
हल्द्वानी येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या
सभेनंतर सभास्थळाचे गंगाजल शिंपडून कथित ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याच्या घटनेच्या
निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. तसेच या
घटनेविरोधात आवाज उठविणारे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर
गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस भवन येथे भाजप व मोदी सरकारविरोधात
घोषणाबाजी करण्यात आली. हे आंदोलन खासदार प्रणिती शिंदे आणि शहराध्यक्ष चेतनभाऊ
नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. काँग्रेस पदाधिकारी आणि
कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या घटनेचा निषेध केला.
कथित शुद्धीकरणाच्या घटनेचा निषेध
हल्द्वानी येथील कथित ‘शुद्धीकरणा’ची घटना ही केवळ
मल्लिकार्जुन खर्गे यांचा अपमान नसून दलित, वंचित आणि बहुजन समाजाच्या स्वाभिमानाला
धक्का देणारी असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. भारतीय संविधानाने
समानता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये दिली असताना
जातीय भेदभावाला प्रोत्साहन देणाऱ्या प्रवृत्तींवर कारवाई होणे अपेक्षित असल्याचे
काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले. मात्र, या घटनेविरोधात
आवाज उठवणाऱ्या राहुल गांधी यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आल्याने
कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
काँग्रेस भवन परिसर घोषणांनी दणाणला
आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार
घोषणाबाजी केली. “दलितांचा अपमान करणाऱ्या भाजप सरकारचा
निषेध असो”, “राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या
सरकारचा निषेध असो”, “दलितविरोधी नरेंद्र मोदी सरकारचा निषेध
असो” अशा घोषणांनी काँग्रेस भवन परिसर दणाणून गेला.
‘राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही’
यावेळी काँग्रेसचे नगरसेवक नरसिंह आसादे यांनी
भाजप सरकारवर जोरदार टीका केली. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर सभास्थळ
‘अपवित्र’ झाल्याच्या मानसिकतेतून शुद्धीकरण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या
घटनेविरोधात राहुल गांधी यांनी संसदेत आणि जनतेसमोर आवाज उठवला. जातीय भेदभाव आणि
अस्पृश्यतेविरोधात भूमिका घेत दोषींवर कारवाईची मागणी केली. मात्र, अन्याय करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या
राहुल गांधी यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला, असा आरोप
आसादे यांनी केला. ही कारवाई सूडबुद्धीची आणि दडपशाहीची मानसिकता दर्शवणारी
असल्याचे सांगत काँग्रेस त्याचा तीव्र निषेध करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संविधानाच्या मूल्यांसाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून
देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुता
आणि न्यायाची दिशा दिली. त्यामुळे जातीय भेदभाव आणि अस्पृश्यतेला
प्रोत्साहन देणाऱ्या मानसिकतेविरोधात काँग्रेस ठामपणे आवाज उठवत राहील, असे यावेळी सांगण्यात आले.
“अन्याय करणाऱ्यांना संरक्षण आणि
अन्यायाविरोधात बोलणाऱ्यांवर गुन्हे, ही लोकशाहीची वाट नाही.
FIR दाखल करून राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही,” असा निर्धार काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. दलित, वंचित आणि बहुजन समाजाच्या न्यायासाठी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा राहणार
असून, जातीयवाद आणि अस्पृश्यतेविरोधातील लढा पुढे सुरू
ठेवण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती
या आंदोलनात काँग्रेसचे नगरसेवक नरसिंह आसादे, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, ब्लॉक
अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, उदयशंकर चाकोते, परशुराम सतारेवाले, दिनेश म्हेत्रे, सागर उबाळे, वाहिद बिजापूरे, अशोक
कलशेट्टी, तिरुपती परकीपंडला, युवराज
जाधव, भीमाशंकर टेकाळे यांच्यासह
अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काँग्रेसच्या वतीने अन्यायाविरुद्ध
आवाज उठवत राहू, संविधानाच्या रक्षणासाठी लढत राहू
आणि सामाजिक समतेसाठी संघर्ष करत राहू, असा निर्धार
व्यक्त करण्यात आला.