विडी कामगारांना रोजगार न दिल्यास सिटूतर्फे बेमुदत धरणे आंदोलन!

सोलापूर, दि. २९ : विडी कामगारांना नियमित रोजगार मिळावा आणि शासनाने निश्चित केलेल्या किमान वेतनाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी सिटूने आक्रमक भूमिका घेतली आहे. विडी कामगारांना कच्चा माल देऊन काम सुरू करण्यात आले नाही, तर सोमवार, दि. ३१ ऑगस्टपासून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेट येथे हजारो कामगारांच्या सहभागाने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी दिला. विडी कामगारांना शासनाने निश्चित केलेले किमान वेतन देण्याऐवजी काही मोजक्या कामगारांना हाताशी धरून वेतनाबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सिटूने केला आहे. कामगारांचा रोजगार बुडू नये आणि विडी कारखाने बंद किंवा स्थलांतरित होऊ नयेत, यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, २६ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात विडी कामगारांच्या किमान वेतनाच्या प्रश्नावर बैठक झाली. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला पुणे विभागाचे अपर कामगार आयुक्त अभय गीते, सहायक कामगार आयुक्त मंगेश झोले, सरकारी कामगार अधिकारी जयदीप मगर तसेच विविध विडी कारखानदार उपस्थित होते.

किमान वेतनाच्या अंमलबजावणीदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणी कारखानदारांनी लेखी स्वरूपात मांडाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच कारखानदारांचे म्हणणे शासन दरबारी योग्य पद्धतीने मांडले जाईल, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली.

मात्र, २९ ऑगस्ट रोजी कामगारांनी तयार केलेल्या विड्यांच्या खेपा कारखान्यात जमा केल्यानंतर पुढील कामासाठी आवश्यक तेंदूपत्ता आणि तंबाखू हा कच्चा माल देण्यात आला नसल्याचा दावा सिटूने केला आहे. त्यामुळे रोजगार बंद होण्याच्या भीतीने कामगारांमध्ये चिंता निर्माण झाली असून अनेक कामगारांनी सिटूकडे तक्रारी केल्या आहेत. सिटूच्या म्हणण्यानुसार, सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी विडी कामगारांना नियमितपणे कच्चा माल देण्यात यावा आणि तयार विड्यांच्या खेपा स्वीकारून कामकाज सुरू ठेवावे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेट येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल.

विडी कामगारांना त्यांचा हक्काचा रोजगार मिळालाच पाहिजे आणि शासनाने जाहीर केलेल्या किमान वेतनाची प्रभावी अंमलबजावणी झालीच पाहिजे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा कॉ. नरसय्या आडम यांनी दिला.