शेतकरी बापाची लेक स्पर्धा परीक्षेसाठी हॉस्टेलवर; २२ वर्षीय तरुणी बेपत्ता, मैत्रिणीच्या जबाबाने प्रकरणाला नवं वळण
छत्रपती संभाजीनगर : बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील २२ वर्षीय तरुणी स्पर्धा परीक्षेची
तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आली होती. मात्र, मे २०२४ मध्ये ती अचानक बेपत्ता झाली. तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ तिचा
ठावठिकाणा लागत नसताना, तिच्या एका मैत्रिणीने दिलेल्या महत्त्वाच्या
माहितीनंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शहरात आली
होती
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली परिसरातील ही
तरुणी मार्च २०२४ मध्ये उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी छत्रपती
संभाजीनगरमध्ये आली होती. ती क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका
हॉस्टेलमध्ये राहत होती. २८ मे २०२४ रोजी तिचा मोबाईल अचानक बंद झाला.
पालकांनी हॉस्टेल व्यवस्थापनाशी संपर्क साधल्यानंतर ती २५ मे रोजीच हॉस्टेलमधून
बाहेर पडल्याचे समोर आले. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर क्रांती चौक पोलीस ठाण्यात
तिच्या बेपत्ता होण्याची नोंद करण्यात आली.
मैत्रिणीच्या जबाबाने प्रकरणाला नवं वळण
तरुणीचा शोध सुरू असतानाच तिच्या एका
मैत्रिणीने कुटुंबीयांशी संपर्क साधला. संबंधित मैत्रिणीने रोहित राजपूत नावाच्या
तरुणाने आमिष दाखवून तरुणीला सोबत नेल्याची माहिती दिल्याचे समोर आले आहे. यानंतर रोहित राजपूत हा देखील अचानक घरातून गायब झाल्याची माहिती मिळाली.
त्यामुळे तरुणीला बेकायदेशीरपणे डांबून ठेवल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला.
हतबल वडिलांची न्यायालयात धाव
मुलीचा शोध लागत नसल्याने तिच्या वडिलांनी
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. २५ सप्टेंबर २०२५ रोजी हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत रोहित राजपूत आणि त्याच्या नातेवाइकांना
प्रतिवादी करण्यात आले.
न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान रोहित किंवा
त्याचे नातेवाईक हजर झाले नसल्याचे वृत्त आहे. त्यानंतर तरुणीच्या पालकांनी २५
ऑगस्ट रोजी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
संशयिताविरोधात अपहरणाचा गुन्हा
पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी रोहित
राजपूत याच्याविरोधात तरुणीचे अपहरण करून तिला बेकायदेशीरपणे डांबून ठेवल्याच्या
आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. तरुणीचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नसून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मैत्रिणीने दिलेली माहिती, संशयित तरुणाचा ठावठिकाणा आणि तरुणीच्या बेपत्ता होण्यामागचे नेमके कारण
याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.
कुटुंबीयांकडून मुलीचा शोध घेण्याची मागणी
दोन वर्षांहून अधिक काळ मुलीचा शोध लागत
नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. न्यायालयीन हस्तक्षेपानंतर आता पोलिसांनी
अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याने तरुणीचा शोध लवकर लागेल, अशी अपेक्षा कुटुंबीयांकडून व्यक्त होत आहे. या प्रकरणात तरुणी नेमकी कुठे आहे, तिला कोणत्या परिस्थितीत नेण्यात आले आणि या
घटनेमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.