पहिल्यांदाच वंदे भारतनं प्रवास करणारे सोनम वांगचुक; परीक्षा सुधारणा विधेयकाचे स्वागत
नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या
आंदोलनानंतर लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केंद्र सरकारने लोकसभेत
मंजूर केलेल्या परीक्षा सुधारणा विधेयकाचे स्वागत केले आहे. दिल्लीतील आंदोलनानंतर
लडाखला परतताना वांगचुक यांनी पहिल्यांदाच वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास केला.
त्यांनी भारतीय रेल्वेच्या आधुनिक सुविधांचे कौतुक करत हा अनुभव अत्यंत आनंददायी
असल्याचे सांगितले. तसेच चिनाब रेल्वे पूल पाहण्याची इच्छा व्यक्त करत भारतीय रेल्वेचा
अभिमान वाटत असल्याचे नमूद केले. लोकसभेत मंजूर झालेल्या परीक्षा सुधारणा
विधेयकाबाबत प्रतिक्रिया देताना वांगचुक म्हणाले की, परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि
विश्वास निर्माण करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे. केवळ परीक्षा प्रणालीच
नव्हे, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेतही सकारात्मक बदल व्हावेत,
अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर
कोणतीही कारवाई करू नये, सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता
करावी आणि युवकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करावे, असे
आवाहनही केले.