प्रियकराच्या मदतीने पतीची विष देऊन हत्या; दोन वर्षांनी १५ फूट खोल गाडलेला मृतदेह बाहेर, पत्नीसह दोघे अटकेत

गुजरातमधील जामनगर येथे दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या जिग्नेश मावडिया यांच्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला आहे. पोलिसांच्या तपासानुसार, अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा आरोप असून, मृतदेह एका कारखान्यात १५ फूट खोल खड्ड्यात पुरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जिग्नेश मावडिया बेपत्ता झाल्याची तक्रार दोन वर्षांपूर्वी सिटी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. सुरुवातीच्या तपासात कोणताही ठोस धागादोरा हाती लागला नव्हता. मात्र, अलीकडेच जिग्नेशच्या भावाने संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. तपासादरम्यान पत्नीने पती ऑस्ट्रेलियात नोकरीसाठी गेला असून त्याला मोबाईल वापरण्याची परवानगी नसल्याचा दावा करून कुटुंबीयांची दिशाभूल केल्याचे समोर आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी कथितपणे दारूमध्ये विष मिसळून जिग्नेशला ते पाजले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह जामनगरमधील दरेड परिसरातील भाड्याच्या कारखान्यात नेऊन १२ ते १५ फूट खोल खड्ड्यात पुरण्यात आला.

जिग्नेशच्या भावाने पत्नीच्या उत्तरांबाबत संशय व्यक्त करून पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर तपास अधिक तीव्र करण्यात आला. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यांच्या माहितीच्या आधारे फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत उत्खनन करण्यात आले आणि तेथून मानवी सांगाडा व अवशेष जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध हत्या तसेच पुरावे नष्ट केल्याचे गुन्हे दाखल केले असून, जप्त अवशेषांची डीएनए आणि इतर वैज्ञानिक तपासणी सुरू आहे. तपास अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.