धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोलापुरात महाविकास आघाडीचा आनंदोत्सव; विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय असल्याचा दावा

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोलापूर शहरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पार्क चौक येथे लाडू वाटप करून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित घटनांमध्ये मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांना मेणबत्त्या प्रज्वलित करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महेश गादेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांनी, "देशभरातील विद्यार्थी, युवक, विरोधी पक्ष आणि विशेषतः राहुल गांधी व अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संघर्षामुळे सरकारला निर्णय घ्यावा लागला. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा विद्यार्थ्यांच्या लढ्याचा विजय आहे," असा दावा केला. नरोटे यांनी पुढे आरोप केला की, नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाकडे सरकारने सुरुवातीला दुर्लक्ष केले. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज, अश्रुधूर आणि दडपशाहीचा वापर करण्यात आल्याचे आरोप त्यांनी केले. "विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांच्या प्रश्नांवर संवाद साधण्याऐवजी दडपशाही करणे लोकशाहीसाठी घातक आहे," असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तसेच महाविकास आघाडीच्या विविध घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.